नवी दिल्ली,
Temperatures drop in India उत्तर भारतात हिवाळ्याचा जोर वाढला असून कानपूर, आग्रा, इटावा यांसारख्या उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने घसरले आहे. सकाळपासूनच दाट धुक्याची चादर पसरत असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच हवेतल्या गारठ्याची तीव्रता वाढल्याने थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बिहारमध्येही परिस्थिती गंभीर असून राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये दाट धुके पसरले आहे. पश्चिम व पूर्व चंपारण, मुझफ्फरपूर, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज ते पूर्णिया सर्व भागात दृश्यमानता केवळ ५०० मीटरपर्यंत खाली आली आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्ली-एनसीआरमध्येही थंडीने वेग घेतला आहे. राजधानी दिल्लीचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले असले तरी ही घसरण हिवाळ्याच्या प्रखर सुरुवातीचे संकेत देणारी आहे.
आयएमडीच्या मते, ३ डिसेंबरला दिल्ली सर्वात थंड असून रात्रीचे तापमान ७ अंशांपर्यंत खाली जाईल. गुडगाव, फरीदाबाद, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद येथेही किमान तापमान ९ अंशांपर्यंत तर नोएडात १० अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. ५ डिसेंबरसाठी दिल्लीमध्ये ‘पिवळा इशारा’ जारी करण्यात आला असून सकाळच्या धुक्यामुळे दृश्यमानता कमी राहील. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पर्वतीय राज्यांमध्येही हिवाळ्याची चाहूल ठसठशीतपणे जाणवत आहे. उत्तराखंडमध्ये थंडी स्थिरावली असून पर्यटकांसाठी हवामान सुखद असले तरी स्थानिकांसाठी कोरडी, टोचणारी थंडी अधिक त्रासदायक ठरत आहे. ४ डिसेंबरपासून काही भागात हलक्या बर्फवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तरकाशी, चमोली आणि पिथोरागडमध्ये हलक्या पावसाचाही अंदाज आहे. ३ डिसेंबरच्या सकाळी उत्तराखंडमध्ये थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून देहरादून, ऋषिकेश, हरिद्वार आणि हल्द्वानीमध्ये तापमान ५ ते ८ अंशांदरम्यान राहील. उंच पर्वतीय जिल्ह्यांमध्ये, जसे मसूरी, नैनिताल, चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी, येथे किमान तापमान १ ते ४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. उंचावर दंव पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.