अनिल कांबळे
नागपूर,
vehicle-rule-violation : अल्पवयीन मुलांना दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालवण्यास कायद्यानुसार बंदी असली तरी अनेक पालक आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यासाठी परवानगी देतात. अशातच एका अल्पवयीन मुलाला कार चालविताना साेनेगाव वाहतूक पाेलिसांनी पकडले. त्या मुलाच्या वडिलांना वाहतूक पाेलिसांनी घसघशीत 30 हजारांचा दंड ठाेठावण्यात आला.
पलाश (38) रा. एम्प्रेस मिल काॅलनी, असे वाहतूक शाखेने 30 हजारांचा दंड वसूल केलेल्या पालकाचे नाव आहे. आपला मुलगा अल्पवयीन असल्याचे माहित असूनही पलाश यांनी मुलाच्या हाती कारची चावी दिली. त्यांचा मुलगा 26 नाेव्हेंबर या दिवशी दुपारी दाेनच्या सुमारास वर्धा मार्गावरच्या काेकाकाेला चाैकातून कार चालवत हाेता. कार चालविण्यात नवखा असलेल्या मुलाकडून कार अनियंत्रित झाली. त्यामुळे कार झिगझॅग चालवत हाेता.
यादरम्यान, वाहतूक पाेलिसांच्या साेनेगाव शाखेच्या पाेलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. पाेलिसांनी त्याच्याकडे वाहन परवाना मागितला असता ताे ते देऊ शकला नाही. माेटर वाहन कायद्यांन्वये त्याला चलान देण्यात आले. पुढील चाैकशीनंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयानेही मुलगा अल्पवयीन असल्याने मुलाच्या वडिलांना 13 डिसेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहून 30 हजारांचा दंड भरण्याचे आदेश सुनावले. पलाश यांनी तातडीने दंडाची ही रक्कम भरली. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन साेनेगावचे पाेलिस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी केले आहे.