आर्वीत मुख्यमंत्री फडणवीस स्टाईल आ. वानखेडेंनी केली चिरफाड

    दिनांक :03-Dec-2025
Total Views |
प्रफुल्ल व्यास
वर्धा, 
Sumit Wankhede : वर्धा जिल्ह्यातील ५ नगर पालिकांचा लोकोत्सव काल थांबला. देवळी नपला २० रोजी मतदान होईल आणि २१ रोजी जिल्ह्यातील सहाही नगर पालिकांचे निकाल हाती येतील. जिल्ह्यात नपच्या जवळपास ८ वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. त्यामुळे सर्वांमध्येच उत्सुकता होती आणि आता निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. दोन आमदार आणि एक खासदार असे मातब्बर नेते असलेल्या आर्वीच्या निवडणुकीकडे सर्वांचे डोळे लागले होते. एबी फॉर्म चोरी जाण्यापासुन सुरू झालेल्या आर्वीतील प्रचाराचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टाईल आ. सुमीत वानखेडे यांनी विरोधकांची केलेली चिरफाड! आ. वानखेडे आणि सुधीर दिवे या जोडीने तुफान फटकेबाजी करीत प्रचाराच्या शेेवटच्या रात्री थंडीत मतदारांच्या टाळ्यांनी वातावरण गरम करून टाकले.
 
 
 
sumit
 
 
 
जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघांमध्ये गेल्या पाच-सात वर्षांपासुन आर्वी तालुकाच राजकीय घडामोडींचा केंद्र बिंदू राहिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची सावली म्हणून राहणारे वानखेडे यांची आर्वीत एन्ट्रीच होऊ नये म्हणून एखाद दोन सर्वतोपरी प्रयत्न झाले. परंतु, वानखेडे यांनी फिल्डींगच अशी लावली होती की त्यांनी षटकार ठोकत विधानसभेची मॅच आपल्या ताब्यात घेतली आणि मातब्बरांचे धाबे दणाणले. विधानसभा निवडणुकीनंतर ३६५ दिवसातच जिल्ह्यात नगर पालिका निवडणुका लागल्या. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्याच दिवशी महायुतीत मोठी दरार पडली. काँग्रेसचे एबी फॉर्म चोरी गेले आणि त्याचे बक्षीस म्हणून बाळा जगताप यांच्या पत्नीला महाविकास आघाडीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली. प्रचार संपण्याच्या आदल्या दिवशी खा. काळे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवारांचे पती बाळा जगताप यांनी सभा गाजवली.
 
 
दुसर्‍या दिवशी प्रचार संपण्याच्या शेवटच्या तासात पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधील काहींचा भाजपात प्रवेश सभेत आ. वानखेडे यांनी खा. काळे आणि जगताप यांची आपले गुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्टाईल चिरफाड केली. खा. काळे यांचे भाषण म्हणजे संतभुमी असलेल्या आर्वीच्या संस्कृतीला कलंक लावणारे भाषण असल्याचा चौकार लावत आता बोलले तर बोलले नंतर बोलू नका असे ठणकावून दिले. बाळा जगताप यांनी आता संसदेत भाषण द्यावे संसदेच्या भींती धन्य होतील असा सल्ला देत षटकार मारला आणि आर्वी नपच्या निवडणूक इंटरनॅशनल स्तरावर पोहोचवल्याबद्दल आभारही मानले. जगताप आर्वीचे मटेरिअरच नाही, असा टोला लगावला. खा. काळेच स्वत:चे राजकारण संपणार असल्याचे भविष्य वर्तवले.
 
 
सुधीर दिवेंचे लाव रे तो व्हीडिओ
 
 
वर्धा जिल्ह्यातील निवडणूक आणि सुधीर दिवे हे एक समिकरण आहे. आर्वी नप निवडणुकीसाठीही दिवे तळ ठोकून होते. प्रचार सभेत दिवे यांनीही तुफान फटकेबाजी केली आणि राज ठाकरे स्टाईलमध्ये ‘लाव रे तो व्हीडिओ’ सांगून दिवाळीच्या दिवशी झालेले खा. काळे यांचे भाषणच या कार्यक्रमात एैकवले. बाळा जगताप यांनी प्रहार, शिवसेना, भाजपा आणि आता महाविकास आघाडी असा प्रवास केला. ते स्वतंत्र विचाराचे असताना त्यांचा यानिमित्ताने राजकीय गेम झाला. त्यांना विधानसभेत तुतारी दिली नाही आणि आता पुर्ण पंजाही दिला नाही. यानिमित्ताने २०२९ च्या निवडणुकीतील चळवळीचा अंत केला असल्याचे सुधीर दिवे सांगून मैदानाच्या बाहेरच चेंडू टोलवला. या दोन भाषणात कितीवेळा टाळ्या वाजल्या असतील याची नोंदही शक्य नाही.