वर्धा,
ballot-paper-evm-voting : बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विरोधकांची मागणी देशात सुरू असली तरी इव्हीएमनेच मतदार, मतदानासाठी काम करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना दिलासा दिला आहे. मतदानापासुन ते मतमोजणीपर्यंतचे सर्वच कामं इव्हीएममुळे कमी वेळात होऊ लागले आहेत. जिल्ह्यात २ रोजी ६०.५० टके मतदान झाले. हे मतदान पोटात साठवत जिल्ह्यातील ६०२ इव्हीएम पोलिसांचा तैनातीत २० दिवस सासरी मुकाम करणार आहेत. यात २८७ कंट्रोल युनिट तर ६०२ बॅलेट युनिटचा समावेश आहे.
जिल्ह्यात वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, सिंदी रेल्वे आणि आर्वी या ५ नगर पालिकांमध्ये अतिशय शांततेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या नेतृत्वात निवडणूक कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यात वर्धा नपसाठी ५७.३३ टक्के, हिंगणघाट येथे ६२.२० टक्के, आर्वी येथे ६१.२७ टक्के, पुलगाव ५९.१९ टक्के तर सिंदी रेल्वे नगर पालिकेत ७१.२२ टक्के मतदान झाले. वर्धेत ३४ केंद्रांवर ६० टक्केहून अधिक तर केंद्र क्रमांक ५/५ मध्ये केवळ ३४.३४ टक्के मतदान झाले.
वर्धा येथे ८९ पैकी ३४ मतदान केंद्रांवर ६० टक्केहून अधिक मतदान झाले. वर्धा नगरपालिकेचा अध्यक्ष व ३८ सदस्यपदासाठी वर्धेत ५७.३३ टक्के मतदान झाले. ८८ हजार १३ मतदारांपैकी ५० हजार ४५४ मतदारांनी मताधिकार बजावला. यात २५ हजार ७८९ पुरुष, २४ हजार ६६१ महिला तर ४ तृतीयपंथींचा समावेश आहे.
सिंदीत ७१.२२ टके मतदान
सिंदी रेल्वे : येथे १९ केंद्रांवर २१ उमेदवारांसाठी मतदान पार पडले. यंदा प्रथमच ७१.२२ टके विक्रमी मतदान झाले असून ४ हजार ७७ महिलांनी मतदानात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. बोचर्या थंडीत देखील सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील सर्व मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली होती. उन्ह वाढल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या लांब रांगा रात्री ६.३० वाजेपर्यंत बघायला मिळाल्या. शहरातील १० प्रभागात नोंदणीकृत ११ हजार ९५८ मतदारांपैकी ८ हजार ५१७ मतदारांनी आपला हक बजावला. त्यात ४ हजार ४४० पुरुष आणि ४ हजार ७७ महिलांचा सहभाग होता. प्रभाग ७/२ मध्ये नगर विद्यालय केंद्रावर सर्वाधिक ८२ टके तर प्रभाग ९/२ मध्ये सर्वात कमी केवळ ६४.५ टके मतदान झाले.
कंट्रोल आणि बॅलेट युनिट
मतदान प्रक्रीयेत कंट्रोल आणि बॅलेट युनिटचा वापर केला जातो. वर्धा नगर पालिकेसाठी ८९ कंट्रोल युनिट तर १८६ बॅलेट युनिटचा वापर झाला. हिंगणघाट येथे १०४ कंट्रोल युनिट तर २२२ बॅलेट युनिट, आर्वी येेथे ४३ कंट्रोल युनिट तर ८० बॅलेट युनिट, पुलगाव येथे ३२ कंट्रोल तर ७४ बॅलेट युनिट तसेच सिंदी रेल्वे येथे १९ कंट्रोल युनिट तर ४० बॅलेट युनिटच्या माध्यमातून मतदान झाले.