मुंबई,
Winter session in Nagpur महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूरमध्ये होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला गेला की, १३ आणि १४ डिसेंबर, शनिवार आणि रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवसांमध्येही विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहांचे कामकाज पार पाडले जाईल.
विधानभवन येथे झालेल्या बैठकीत विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, तसेच विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, सुनील प्रभू, अमीन पटेल आणि विधानपरिषद सदस्य अनिल परब, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, तसेच विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देण्यात आली की, ‘भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल’ या ऐतिहासिक पर्वानिमित्त दिनांक २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत चर्चा झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे पुस्तक स्वरूपातील संकलन महाराष्ट्र विधिमंडळ वि.स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या पुढाकारातून तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक प्रकाशन सोहळा मंगळवार, ९ डिसेंबर २०२५ रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बैठकीत दिली.