अग्रलेख
change काही गोष्टी योगायोगासारख्या असतात. वरवर पाहता त्यांचा एकमेकांशी संबंध दिसत नाही. पण त्यामागे लपलेले काही अदृश्य बिंदू जोडले की त्यातून तयार होणारे चित्र त्याचा अर्थ स्पष्ट करतात. राजकारणात तर अलिकडच्या काळात अशा विचित्र योगायोगांना बहरच आला आहे. जेमतेम पंधरावीस दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्याचे दुवे राजकारणाशी अशाच काहीशा अनपेक्षित प्रकारे जोडले जातील या योगायोगाची तेव्हा कोणी कल्पनाही केली नसेल. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या स्वागत समारंभाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेजवानीस काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी किंवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांच्याऐवजी त्या पक्षाचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आल्याने काँग्रेस व केंद्र सरकारमधील वाद गाजत असतानाच पंतप्रधानांनी त्याच दरम्यान केलेले एक वक्तव्य अशाच एका योगायोगाचे मूळ ठरू पाहात असल्याचे ध्यानी येऊ लागले आहे. येत्या दहा वर्षांत गुलामगिरीची मानसिकता संपुष्टात आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला, त्याच दरम्यान, काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या वादावर स्वत: थरूर यांनीच निर्भीडपणे उत्तर दिले.
या मेजवानीचे निमंत्रण आपल्याला मिळाले आहे आणि मी त्यास उपस्थित राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले, तेव्हा काँग्रेसच्या तंबूतील अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या होत्या. निमंत्रणाच्या मुद्यावरून एका बाजूला पक्ष केंद्र सरकारला धारेवर धरण्याची तयारी करत असताना त्याच पक्षाचा एक खासदार निर्भयपणे पक्षाच्या भूमिकेहून थेट वेगळी भूमिका घेतो हे स्पष्ट झाले, तेव्हा काही मोजक्यांच्या मनात तरी, मोदी यांच्या त्या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे उमटणाऱ्या वेगळ्या अर्थाचा उलगडा नक्कीच झाला असेल आणि मोदी यांनी ज्या गुलामगिरीचा उल्लेख केला तो संकेत काँग्रेसच्या दिशेने तर नसेल अशी शंकाही काहींच्या मनात नक्कीच आली असेल. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याशी निष्ठा म्हणजेच पक्षनिष्ठा असे मानण्याची परंपरा पूर्वीपासूनच चालत आली आहे. ‘इंदिरा इज इंडिया’ हे स्तुतिस्तोत्र जेव्हा पहिल्यांदा गायिले गेले, तेव्हापासून हीच परंपरा जोपासली जात आहे. त्यामुळे आपल्या अशा देशभक्तीचे प्रदर्शन घडविण्याची संधी अनेक जण सातत्याने शोधत असताना, थरूर यांच्यासारख्या नेता मात्र त्याहून वेगळी भूमिका घेतो आणि परंपरेला छेद देतो, तेव्हा गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ततेच्या मोदी यांच्या संकल्पाचा पहिला संकेत थेट काँग्रेसी मानसिकतेकडेच असावा याविषयी खात्रीदेखील पटू लागते. काँग्रेसमध्ये गेल्या सुमारे दहा-अकरा वर्षांत, विशेषतः राहुल गांधी हेच पक्षाचे सर्वेसर्वा नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वास कोणत्याही प्रकारे आव्हान दिले जाणार नाही यासाठी पक्षांतर्गत पातळीवर काही निष्ठावंतांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याने अनेक जण मूकपणे याकडे पाहात असले, तरी त्यांच्या मनातील अस्वस्थता मात्र लपून राहिलेली नाही. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची भूमिका जगासमोर स्पष्ट करण्यासाठी विदेशात पाठविलेल्या शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश होता आणि या शिष्टमंडळाने अमेरिका, पनामा, ग्वायना, ब्राझील, कोलंबिया आदी देशांना भेट देऊन भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, याचे पडसाद काँग्रेसमध्ये उमटले आणि त्यातून पक्षांतर्गत मतभेदही उघड झाले. थरूर यांनी पक्षाची परवानगी न घेता शिष्टमंडळात सहभागी होण्यास संमती दिल्याचा आक्षेप घेत काँग्रेसच्या काही श्रेष्ठींनी नाराजीचा सूर लावला असला, तरी पक्षातीलच काहींनी मात्र त्यांच्या सहभागाचे राष्ट्रहिताची बाब म्हणत धीटपणाने समर्थनही केले होते. बहुधा, पक्षांतर्गत गांधीनिष्ठेच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या नव्या प्रक्रियेस येथे नवा प्रारंभ झाला असे म्हणता येईल.
आता त्या कुजबुजत्या सुरांना कंठ फुटू लागला आहे. असंख्य निवडणुकांत केवळ पराभवच पाहावा लागलेल्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाऐवजी प्रियांका गांधी यांना काँग्रेसच्या पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे आणण्याच्या मागणीचा कुजबुजता सूरदेखील आता उमटू लागला आहे, हा देखील कदाचित गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग असावा. काँग्रेसच्या 140 व्या स्थापना दिन सोहळ्याच्या काही तास अगोदर पक्षाचे सर्वांत निष्ठावंत मानले जाणारे नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाच्या नेतृत्वास झोंबणारी काही मते व्यक्त केली, तेव्हाही मोदी यांच्या वक्तव्यातील संकेतांची सत्यता दिसू लागली होती. दिग्विजय सिंह यांनी समाज माध्यमावरील एका टिप्पणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्काराची आणि पंतप्रधान मोदी यांच्या संघनिष्ठेची भरभरून प्रशंसा केली आणि थरूर यांच्यामुळे उद्भवलेल्या वादळापाठोपाठ नवे वादळ पक्षात घोंघावू लागले. दिग्विजय सिंह यांचे हे मत काँग्रेसच्या विचारसरणीविरोधात असल्याची टीका पक्षाचे अन्य अनेक नेते आता करत असले, तरी शशी थरूर यांच्यासारख्या नेत्याने मात्र त्यांच्या मताशी सहमतीदेखील दर्शविली आहे. दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केलेले हे मत राहुल गांधी यांच्या भूमिकेशी संपूर्ण असहमती दर्शविणारे आहेच, पण राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची संघटनात्मक वाताहत होत असल्याची भावनाही व्यक्त करणारे आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये गुलामगिरीच्या परंपरेचे पाईक समजणारे घराणेशाहीचे निष्ठावंत आणि गलामगिरीची मानसिकता झुगारून थेट व्यक्त होण्याचे धाडस दाखविणारे पक्षाचे निष्ठावंत अशी दुफळी दिसू लागली आहे. कदाचित, दिग्विजय सिंह यांचे पक्षातील स्थान संथपणे संपुष्टात येण्याची प्रक्रिया येथून सुरू होईल आणि पक्ष पुन्हा आपल्या निष्ठेच्या परंपरागत वाटेवरून चालू लागेल, पण मानसिकतेत होणाèया बदलाचे नवे रूप धारण केल्याचे चित्र मात्र आता लपविता येणार नाही. भाजपासारख्या पक्षातील एक सामान्य कार्यकर्ता पंतप्रधानपदापर्यंत पोहोचतो, ही संघाच्या शिस्तीची शक्ती आहे, असे मत दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या समाज माध्यमावरील टिप्पणीतून व्यक्त केल्यानंतरही राहुल गांधी आणि दिग्विजय सिंह यांच्या योगायोगाने समोरासमोर झालेल्या भेटीतील राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून दिग्विजय सिंह यांच्याविषयीच्या नाराजीचा कडवट सूर उमटला. तुम्ही बदमाशी करत आहात, या शब्दांत राहुल गांधी यांनी त्यांना सुनावले. त्या वेळीच वातावरण काहीसे हलकेफुलके दिसत असले तरी त्यातून निष्ठावंतांना योग्य तो संदेश मिळाला असून दिग्विजय सिंह यांच्यावर पक्षातून शाब्दिक हल्ले सुरू झाले आहेत.
गुलामी मानसिकतेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुमारे सहा वर्षांपूर्वी काही बंडखोरांनी केला होता. मात्र, त्या वेळी या बंडाचा बंदोबस्त करण्यात गांधीनिष्ठांना यश आले होते. मात्र, त्यानंतरही काँग्रेसमधील नाराजी खदखदत राहिली आहे, हे आता नव्याने स्पष्ट झाले आहे. भाजपामध्ये भाकरी फिरविण्याची पद्धत आहे, हे दिग्विजय सिंह यांचे मत थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वास आव्हान देणारे असल्याचे मानले जात आहे आणि त्यामुळेच आता दुफळीचे नवे परिणाम काँग्रेसमध्ये पाहावयास मिळणार आहेत. राहुल गांधींच्या राजकारणाचा देशातील जनतेवर कोणताही प्रभाव पडत नसल्याचे तर केव्हाच स्पष्ट झाले आहे. सातत्याने अदानी-अंबानी यांच्याविरोधात मोदी सरकारवर टीका करण्याच्या त्यांच्या भूमिकेतील हवा तर आता संथपणे काढली जात आहे. काँग्रेस आघाडीसोबत असल्याचे सांगणाèया राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे नेते शरद पवार यांनी बारामतीमधील एका प्रकल्पाच्या उद्घाटनास उद्योगपती गौतम अदानी यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले आणि संपूर्ण पवार परिवाराने अदानी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.change उभ्या देशाने हे दृश्य अनुभवल्याने, अदानी-अंबानीविरोधाच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या विरोधात सुरू केलेल्या प्रतिमाहनन मोहिमेची हवा काढून घेतली गेली आहे. भाजपाविरोधी आघाडीला काँग्रेसखेरीज पर्याय नाही असा गुलामी मानसिकतेचा समज पुसला जात असल्यानेच हे लक्षण आहे. गुलामगिरीची मानसिकता नष्ट करण्याच्या मोदी यांच्या संकल्पाची सुरुवात राजकारणापासून झाली आहे, असे स्पष्ट संकेत आता मिळू लागले आहेत. एका परीने हे राजकारणातीलही परिवर्तनाचे पर्व ठरेल.