तैपेई शहर,
China blockades Taiwan border जगभरात कडक हिवाळ्याच्या सत्रातही चीनने तैवानच्या सीमेवर लष्करी दबाव वाढवला आहे. तैवानच्या सीमावर्ती भागात चीनने आपले तीनही सैन्यदल – जमीन, समुद्र आणि हवाई – मोठ्या प्रमाणात तैनात केले असून, तैवानच्या सीमेवर लष्करी सराव सुरू आहेत. या सरावामुळे हवाई वाहतूक प्रभावित झाली असून, अनेक उड्डाणे रद्द केली गेली आहेत. तैवानच्या हवाई अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कारणास्तव अंदाजे 100,000 प्रवाशांवर परिणाम होऊ शकतो.
अलीकडेच, अमेरिकेने तैवानला 11 अब्ज डॉलर्स किमतीची शस्त्रे पुरवण्यास मान्यता दिली, ज्यामुळे चीन संतप्त झाला आहे. चीन तैवानला आपला भाग मानतो आणि त्याच्या वन चायना धोरणानुसार कोणतीही स्वतंत्रता मान्य करत नाही. जपानचे पंतप्रधान साने ताकाची यांनीही चेतावणी दिली की, चीनने तैवानवर आक्रमण केल्यास जपानी सैन्य युद्धात सामील होईल, ज्यामुळे चीन आणखी संतप्त झाला आहे.
चीनच्या नेतृत्वाने म्हटले आहे की, तैवानला आपल्याखाली आणण्याची ही योग्य वेळ आहे. सोमवारी जारी केलेल्या निवेदनात त्यांनी अमेरिका किंवा जपानचे नाव घेतले नाही, तरी परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यांमध्ये असे म्हटले आहे की, अमेरिकेच्या पाठिंब्याने तैवान स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तैवानने आपले सुरक्षा दल सतर्क ठेवले असून, कोणत्याही परिस्थितीत धोक्याला तोंड देण्यासाठी तयारी सुरू आहे. चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सामुद्रधुनी, उत्तर, नैऋत्य आणि आग्नेय दिशांमध्ये लष्करी सराव सुरू आहे. सध्या तैवानच्या सर्व बाजूंनी चीनने वेढा घातला आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.