सर्वात स्वच्छ इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे शेकडो रुग्णालयात

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
इंदूर,
Contaminated water in Indore देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये पाणीपुरवठ्याच्या गंभीर प्रश्नामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील भागीरथपुरा परिसरात दूषित पाणीपुरवठा झाल्याने गेल्या काही दिवसांत मोठ्या संख्येने नागरिक आजारी पडले असून, ही संख्या आता ३०० च्या पुढे गेली आहे. २४ डिसेंबरपासून या भागात नागरिकांना अचानक उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि अपचनासारख्या तक्रारी जाणवू लागल्या. सुरुवातीला काही रुग्ण आढळले होते, मात्र दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

indore water problem 
प्रकृती अधिक बिघडलेल्या रुग्णांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधत सरकारकडून सर्व उपचार मोफत केले जातील, असे आश्वासन दिले. घाबरून जाण्याची गरज नसून प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिलासादायक बाब म्हणजे सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तात्काळ प्रशासनाला सतर्क राहण्याच्या आणि आवश्यक सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, परिसरात सुरू असलेल्या उत्खनन कामादरम्यान ड्रेनेज लाईनला गळती लागल्याने पाणी दूषित झाले असावे किंवा पाणीपुरवठ्याच्या प्रक्रियेत अशुद्ध घटक मिसळले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संशयाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.