गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त उसळला भक्तीचा सागर

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
हिंगणघाट, 
gadge-babas-death-anniversary : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रा महोत्सवात अनुयायांची मांदियाळी पाहायला मिळाली. सत्यपाल महाराजांचे शिष्य, सप्तखंजिरी वादक पवनपाल महाराज वडाळकर (अकोला) यांचा जाहीर कीर्तनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला.
 
 
jk
 
 
पवनपाल महाराजांनी खंजिरीच्या खणखणाटात समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर प्रहार केला. व्यसनमुती, शिक्षण आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना त्यांनी गाडगेबाबांच्या जीवनकार्याची प्रचिती दिली. २० डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज हरिपाठ, भजन व काकड आरतीचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सकाळी मोरेश्वर कोडापे (डाग), प्रभाकर भोयर, गोपाल भोयर व संच यांनी हरिपाठ केला तर रविवार २८ रोजी मोहन महाराज गंडाईत यांच्या गोपाळकाल्याचे कीर्तन झाले. यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे वणा नदीच्या पात्रात सजलेला भव्य आनंद मेळा. यात्रा कमिटीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दुकानांची मांडणी केली होती. यामध्ये बालगोपाळांसाठी विविध प्रकारचे मोठे पाळणे आणि नाविन्यपूर्ण खेळणी मुलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. यात्रेकरूंना चालताना त्रास होऊ नये यासाठी दुकानदारांना २५ डिसेंबरपूर्वीच जागा नेमून देऊन शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. ज्याचा सकारात्मक परिणाम यात्रेत दिसून आला.
 
 
 
कार्यक्रमादरम्यान शहराच्या स्वच्छतेसाठी आणि नियोजनासाठी तत्पर असलेले नपचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांचा गौरव करण्यात आला तसेच गाडगेबाबांच्या समाधी स्थळाचे बांधकाम करणारे कंत्राटदार डुकरे यांचाही स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्वच्छता आणि वृक्षारोपणाचा संदेश वणा नदी संवर्धन समिती आणि संत गाडगेबाबा कल्याणकारी मंडळ, पतंजली योग परिवारचे वसंत पाल गुरुजी यांच्या चमुने आणि विविध सामाजिक संघटनातर्फे नदी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. नगर परिषद स्वास्थ्य विभागाचे अनिल थाटे यांनी सात दिवस परिसर स्वच्छ ठेवले. झाडे लावा, झाडे जगवा आणि स्वच्छ ठेवा नदी किनारे असा संदेश देणारे गाडगेबाबांच्या वेशभूषा धारण केलेले जेसवानी लक्ष वेधून घेत होते.
 
 
यशस्वीतेसाठी अध्यक्ष पुंडलिक भेंडे, तुषार हवाईकर, मंगेश वणीकर, अशोक मोरे, रुपेश लाजुरकर, लक्ष्मण बालपांडे, सचिन मोरे, शंकर मोरे, गोपाल जोडांगडे, कुणाल रघाटाटे, पुरुषोत्तम डफ, जनार्दन बाचलकर, देवा शेंडे, शेख अब्बास, प्रणय बालपांडे, छगन मोरे, सुरेश निमरे यांच्यासह कमिटीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सहकार्य केले.