गोरेगाव,
goregaon-shaheed-janya-timya-school : पीएम श्री योजनेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप असलेल्या प्राचार्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, या मागणीला घेऊन स्थानिक शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज, ३० डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन करून महाविद्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात एल्गार केला. या घटनेमुळे संपूर्ण गोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. ४ तास चाललेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांचा सूर अत्यंत ठाम आणि आक्रमक होता. विशेष म्हणजे, येथील प्राचार्य लोंढे या शाळेत राहिले तर आम्ही विद्यार्थी व पालक शाळेत पाऊलही ठेवणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत पालक वर्गही आंदोलनात सहभागी झाला होता. प्रसंगी शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा आणि तालुका प्रशासनाची एकच धावपळ उडाली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम.यांनी आंदोलनस्थळी भेट देत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडून त्वरित दुसरे प्राचार्य नियुक्त करण्याची मागणी केली. यावेळी—जिप अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिप सभापती लक्ष्मण भगत, माजी जिप अध्यक्ष पंकज रांगडाले, जिप शिक्षण समिती सभापती शैलेश नंदेश्वर, तहसीलदार प्रज्ञा भोकरे, गटविकास अधिकारी हेमराज गौतम, गटशिक्षणाधिकारी पारधी तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
बंद दाराआड खलबत
शाळेच्या कार्यालयात ३ ते ४ तास बंद दाराआड बैठकीत विद्यार्थ्यांच्या तक्रारी, पालकांचे आरोप तसेच शाळा प्रशासनावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर अधिकार्यांनी जाहीर केले की, प्राचार्य लोंढे यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, लोंढे हे शिक्षक म्हणून कार्यरत राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, शहीद जाम्या तिम्या जिप शाळेमधील हे प्रकरण काही वर्षांपासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याआधीही तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने अखेर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागल्याचे पालकांनी सांगितले.
चौकशी करून कारवाईचे आश्वासन
या प्रकरणात केवळ बदली किंवा पदावरून हटविण्यापुरते मर्यादित न राहता, शाळेतील निधीचा वापर, पीएम श्री अंतर्गत निधी तसेच आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही चर्चा करण्यात आली. त्यानंतर अधिकार्यांनी प्राचार्य लोंढे यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाईचे आश्वासन दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार संबंधित प्राचार्य यांचा प्रभार काढण्यात येणार असून चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.
- महेंद्र मोटघरे, उपशिक्षणाधिकारी, जि.प. गोंदिया