माजी मंत्री जगदीश गुप्तांचा शिंदेसेनला ‘रामराम’

-डावलल्याची भावना केली व्यक्त -जिगरबाज कार्यकर्त्यांना बळ देणार

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
jagdish-gupta : सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत. या पक्षांमध्ये नेत्यांच्या समोर मुजरा केल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याचे भले होत नाही, येथेही हीच परिस्थिती बघितल्याने निराश झालो. माझ्यासोबत अनेक ‘कमिटमेंट’ करण्यात आल्या, त्या काही वैयक्तिक नव्हत्या. ज्या लोकांनी मला अनेक वर्षांपासून साथ दिली, त्यांच्यासाठी मी या ‘कमिंटमेंट’ स्वीकारल्या होत्या. पण, बोलणी झाल्यानंतर लगेच गोष्टी बदलत होत्या. पक्षात प्रवेश घेतल्यापासून ते आतापर्यंत वारंवार हे होत असल्याने आपण शिवसेना पक्ष ( शिंदे गट) सोडण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे, असे माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
 
 
amt
 
 
जगदीश गुप्ता पुढे म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षावर माझा विश्वास राहिलेला नाही. १९९० च्या काळात राजकारणामध्ये जी ‘व्हीआयपी’ संस्कृती निर्माण झाली होती, ती मोडून काढण्यासाठी मी तेव्हा राजकारणात आलो होतो. आताही फोफावत असलेल्या या व्हीआयपी संस्कृतीला तोडण्यासाठी मी शिंदे गटात प्रवेश घेतला होता. १९९० ते २००० पर्यंत राजकीय नेत्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज पडत नव्हती. पण, नंतर ती परंपरा तुटली. त्यामुळे मी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. तेव्ही गडबड झाली. मी पराभूत झालो. त्यानंतर, कार्यकर्त्यांसाठी मी सक्रीय राजकारण करण्याचा निर्णय घेतला. पण, मी ‘आऊट डेटेड’ राजकारणी झालो आहे. आजच्या राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला स्थान नाही. त्यामुळे आता कोणत्याही पक्षात जायचे नाही, हा निर्णय मी घेतला आहे.
 
 
त्या निर्णयावर मी ठाम आहे. ज्या कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत न्याय झाला नाही, असे वाटत असेल आणि निवडणूक लढण्याची तयारी असेल, अशा ‘जिगरबाज’ कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. मी यापूर्वी जनकल्याण ही संघटना स्थापन केली होती, तेव्हा आम्ही उमेदवार शोधले होते. पण, आता आम्ही उमेदवार शोधणार नाही, तर सक्षम अशा कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी मी खारीचा वाटा उचलणार आहे. मी पक्ष सोडताना कोणत्याही व्यक्तीवर टीका करणार नाही. माझा तो स्वभाव नाही. माझ्यासोबत ज्या ‘कमिटमेंट’ करण्यात आल्या, त्या पूर्ण झाल्या नाहीत, म्हणूनच मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अपक्ष म्हणून लढण्याची तयारी असलेल्या हिंमतबाज कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम मी करणार आहे. कारण मला व्हीआयपी संस्कृती मोडून काढायची आहे.