संवेदनशील कारंजात ‘पीआय’ऐवजी ‘एपीआय’

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
संजय नागापुरे
कारंजा (घा.), 
karanja-pi-api : मादक पदार्थाच्या कारखान्याने कारंजा शहराचा नावलौकीक राज्यात एका रात्रीत पोहोचला आहे. कारंजा शहराचा राज्य शासनाच्या हिवाळी अधिवेशनाही पुकारा झाला. संतांची भूमी म्हणून ओळख असलेले शहर आता मादक पदार्थाचे शहर म्हणून ओळख असलेल्या संवेदन असलेल्या शहरात पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची नियुती अपेक्षित असताता येथील ठाणेदार म्हणून पोलिस उपनिरीक्षकाकडे जबाबदारी देण्यात आल्याने पोलिस प्रशासनाला झाले तरी काय असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
 
 
l
 
शहरासह तालुयात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असताना राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या व संवेदनशील पोलिस स्टेशन म्हणून ओळख असलेल्या कारंजा पोलिस स्टेशन चांगलेच चर्चेत आले आहे. येथे उघडकीस आलेल्या एम. डी. प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यामुळे येथील तत्कालीन ठाणेदारासह सहा पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ मुख्यालयी अटॅच करण्यात आले होते. ठाणेदार म्हणून प्रल्हाद मदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कारंजा शहरासह तालुयातील अवैध व्यवसाय रोखण्याचे आवाहन त्यांच्यापुढे राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मेफेड्रोन ड्रग्ज कारवाईप्रकरणी धगधगत असलेले कारंजा शहर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहे. केंद्रीय महसूल गुप्तचर संचालयाने केलेल्या कारवाईत १९२ कोटी रुपये किमतीचा मफेड्रोन ड्रग्ज सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. कारंजा शहरातील ड्रग्ज तयार करणार्‍या आरोपीसह अन्य आरोपींना अटक करण्यात आली.
 
 
जिल्ह्यात दारूबंदी असूनही तालुयात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची विक्री होत आहे. अवैध मटका, जुगार, पानटपर्‍यांहून होणारी गांजाची विक्री, अवैध रेती उत्खनन, गोळीबार चौक व बसस्थानक परिसरातील वाहतूक नियंत्रण, अवैध वाहतूक, रोड रोमिओ, अल्पवयीन मुलांचे भरधाव वाहने चालविणे यासारख्या अनेक कायदा व सुव्यवस्थेला आळा घालण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून शहरातील अनेक अवैध व्यवसायाला आळा घालण्याकरिता इच्छाशक्तीचा अभाव राहिला आहे. त्यामुळे अनेक अवैध व्यवसायाला अभय मिळत राहिले आहे. बर्‍याचदा थातूरमातूर कारवाईचा दिखावा होतो. परंतु, अवैध व्यवसायावर कायमस्वरूपी जरब मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे अवैध व्यवसायाचा बंदोबस्त करण्याचे नवीन ठाणेदारापुढे मोठे आव्हान असणार आहे.
 
 
येथील पोलिस निरीक्षकांची जिल्हा पोलिस मुख्यालयात बदली झाल्यानंतर कारंजा शहरात नव्याने रुजू झालेले ठाणेदार म्हणून प्रल्हाद मदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील अवैध व्यवसायावर वचक नसल्याने व्यवस्थेची मूकसंमती आहे काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अवैध व्यवसायिकांचा बंदोबस्त करण्याची व पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिस निरीक्षकाच्या नियुती संदर्भात नव्याने रुजू झालेल्या पोलिस अधीक्षकांशी चर्चा करतो अशी प्रतिक्रिया आ. सुमित वानखेडे यांनी दिली.