ढाका,
Khaleda Zia has passed away बांगलादेशच्या राजकारणातील एक प्रभावी आणि महत्त्वपूर्ण अध्याय संपुष्टात आला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख नेत्या खालिदा झिया यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ३० डिसेंबर रोजी पहाटे ढाका येथील एव्हरकेअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही आठवड्यांपासून त्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात उपचार घेत होत्या. मंगळवारी रात्री त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाली आणि सकाळी सहा वाजता त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने दिली.

खालिदा झिया यांच्या निधनाची बातमी पसरताच ढाका शहरात शोककळा पसरली. एव्हरकेअर रुग्णालयाबाहेर बीएनपीचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले होते. बीएनपीच्या सत्यापित फेसबुक पेजवर त्यांच्या निधनाची घोषणा करण्यात आली असून, पक्षाच्या मीडिया सेलनेही यास दुजोरा दिला आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून खालिदा झिया यांनी बांगलादेशच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. अनेक दशकांपर्यंत त्यांनी बीएनपीचे नेतृत्व करत देशाच्या राजकीय घडामोडींना दिशा दिली. या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर खालिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपीचे वरिष्ठ नेते तारिक रहमान यांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरत आहे. तब्बल १७ वर्षांनंतर ते २५ डिसेंबर रोजी लंडनहून बांगलादेशात परतले होते. मात्र हे पुनरागमन आनंदाचे न ठरता शोकाच्या वातावरणात झाले. देशात आल्यानंतर त्यांनी थेट रुग्णालयात जाऊन आईची भेट घेतली आणि काही तास तेथे थांबले होते.
खालिदा झिया यांचे निधन अशा वेळी झाले आहे, जेव्हा बांगलादेश राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील टप्प्यावर उभा आहे. देशात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये झालेल्या तीव्र आणि हिंसक आंदोलनांनंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. त्यानंतर देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले असून नोबेल पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस सध्या या सरकारचे नेतृत्व करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर तारिक रहमान यांचे बांगलादेशात पुनरागमन आणि खालिदा झिया यांचे निधन या दोन्ही घटना आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक मानल्या जात आहेत. खालिदा झिया यांच्या जाण्याने केवळ बीएनपीच नव्हे, तर संपूर्ण बांगलादेशी राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.