आर्वी,
cm-prosperous-panchayati-raj-campaign : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अनेक विकास कामे मार्गी लागत असून गावातील वातावरण ढवळून निघत आहे. ग्रामपंचायत मिर्झापूर नेरी अंतर्गत सरपंच बाळा सोनटके यांच्या अध्यक्षतेखाली ग्राम उत्सव समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेत श्रमदान घेण्याबाबत ठराव पारित करण्यात आला. ग्राम उत्सव समितीच्या माध्यमातून सुरू झालेल्या या श्रमदानाला आज विशाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

नेरी मिर्झापूर ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रमाचा सपाटा सुरू असून या अभियानांतर्गत लोकसहभाग व श्रमदानाच्या माध्यमातून रोज रात्री कडायाच्या थंडीत मिर्झापूर नेरी येथील स्मशानभूमी पोहोच रस्त्याचे मातीकाम व खडीकरण बांधकाम पूर्ण होत आहे. या श्रमदानाकरिता ग्रामस्थांनी एकत्र येण्याकरिता सरपंच बाळा सोनटके यांनी भावनिक आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण ग्रामवासीयांनी रात्री ८ ते १० या वेळेत श्रमदान करण्याचा संकल्प केला आणि या लोक चळवळीला भव्य स्वरूप प्राप्त झाले. या महाश्रमदानाची संपूर्ण विदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. २५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या श्रमदानाने ५०० मीटरचा रस्ता बांधकाम पूर्ण होत असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संजय यावले यांनी दिली असून ते स्वतः या श्रमदानात दैनंदिन सहभागी होत आहे.
रोजमजुरीमुळे रात्रीचे श्रमदान : बाळा सोनटके
मिर्झापूर नेरी हे पुनर्वसित गाव असून या गावातील शेतकर्यांकडे शेती नसल्यामुळे गावातील बहुतांश मजूर वर्ग हा दुपारी मोलमजुरीसाठी जात असतो. उदरनिर्वाहासाठी दिवसभर मजुरीची कामे सांभाळून गावातील पुरुष, महिला तसेच तरुणवर्ग रात्री कडायाच्या थंडीत श्रमदानासाठी ८ ते १० या वेळेत स्मशानभूमी परिसरात एकत्र येतात. त्यांचे श्रमदान बघून अंगात उत्साह संचारून ऊर्जा मिळते, अशी भावनिक प्रतिक्रिया सरपंच बाळा सोनटके यांनी दिली.