तभा वृत्तसेवा
मारेगाव,
contaminated-water : तालुक्यातील वसंतनगर येथील नागरिकांना दूषित आणि फ्लोराईडयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या फ्लोराईड आणि दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. तरी यावर तत्काळ उपाययोजना करावी. यासाठी नागरिकांनी गटविकास अधिकाèयांना निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या दूषित पाण्यामुळे नागरिकांना किडनी सारख्या दुर्धर आजाराचा सामना करावा लागत आहे. या दुर्धर आजारामुळे अनेक नागरिक मृत्युमुखी पडले असून काही अजूनही ग्रस्त असल्याचे दिसून येत आहेत.

मारेगाव आणि पांढरकवडा या दोन तालुक्याला लागून असलेले वसंतनगर हे छोटेसे गाव. हे गाव छोटे असल्यामुळे या गावाकडे राजकीय लोकांचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. येथील नागरिकांना प्यायला साधे स्वच्छ पाणी सुद्धा मिळत नाही, हे याचच उदाहरण आहे. वसंत नगर येथे ग्रामपंचायतच्या मालकीचे एक बोर व दोन विहिरी आहे. विहिरीच्या सभोवताल घाणीचे साम्राज्य आहे. विहिरीमध्ये अशुद्ध पाणी आहे. विहीर आणि बोरमध्ये 1.8 इतकी फ्लोराइड मात्रा आहे. हे पाणी पिण्यास खारट आणि तुरट आहे. हे पाणी नागरिकांना पिण्यास विषयुक्त आहे. त्यामुळे या पाण्याच्या प्रभावाने अनेक दुर्धर आजार होत आहेत. येथील नागरिकांना किडनीचा दुर्धर आजार होत आहेत.
2024 पासून आज पर्यंत 17 पेशंट हे किडनीच्या आजाराने मृत्युमुखी पडले आहे. आज रोजी पाच पेशंट हे किडनीच्याच आजाराने ग्रस्त आहेत.पिण्याच्या पाण्याची गंभीर अवस्था पाहून ग्रामपंचायत वागदराने येथील पिण्याच्या पाण्याचे सगळे सोर्स बंद केले. परंतु पर्यायी व्यवस्था करून दिलेली नाही. त्यामुळे वागदरा येथील आरोचे पाणी घेऊन या आणि प्या असे ग्रामपंचायत सांगत आहे. असाही आरोप नागरिकांनी केलेला आहे. सध्या या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा कोणताही सोर्स नसल्याने लहान मुले तसेच माता यांच्या आरोग्यास खूप धोका निर्माण झालेला आहे.
या गंभीर बाबीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. अन्यथा 6 जानेवारीपासून पंचायत समिती कार्यालयासमोर गावातर्फे धर्मेंद्र हरिदास जाधव अन्नत्याग व आमरण उपोषण करेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी धर्मेंद्र जाधव, विनोद अस्वले, शंकर टेकाम, गुरुदेव टेकाम, विजय चव्हाण, विष्णू चव्हाण, जगन्नाथ आत्राम, राज टेकाम, नेहा आत्राम, सदानंद टेकाम, संगीता टेकाम,सुरेश सुरपाम, संजीवनी आत्राम,स्वप्नील रामपूरे,मधुकर आत्राम, दिनेश अस्वले,प्रेमदास टेकाम, दादाजी आत्राम यांच्यासह अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.