नवीन वर्षाचे स्वागत करताय, जरा जपून!

भंडारा पोलिसांचा तगडा बंदोबस्त...

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
भंडारा,
bhandara-police : इंग्रजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जल्लोषाच्या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून भंडारा पोलिसांनी तगडा बंदोबस्त उभारला असून 67 ठिकाणी फिक्स पॉईंट आणि 26 नाकाबंदी करून नववर्षाची सुरुवात शांततेत व्हावी या दृष्टीने कंबर कसली आहे.
 
 
police
 
 
इंग्रजी नववर्षाचा जल्लोष तरुणाई मध्ये प्रचंड असतो. 31 डिसेंबरच्या रात्री या उत्साहाला उधाण आले असते. अशावेळी हा उत्साह नियंत्रणात राहून नववर्षाचे स्वागत शांततेत व्हावे या दृष्टीने कायमच पोलिसांचा प्रयत्न असतो. भंडारा पोलिसांनी 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त उभारला आहे. भंडारा जिल्ह्यातील संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 67 ठिकाणी फिक्स पॉईंट उभारले गेले आहेत. जिल्ह्यात 26 ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असून, बंदोबस्त लावण्यात आला आहे. चार उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक, 15 पोलीस निरीक्षक आणि 510 कर्मचारी 31 डिसेंबरच्या रात्री नववर्षाचे स्वागत शांततेत व्हावी यासाठी रस्त्यावर येऊन कर्तव्य बजावणार आहेत.
 
 
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांसाठी विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी सांगितले. पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहता नववर्षाचे स्वागत करण्याच्या नादात उनाडक्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांना आता शिस्तीत राहावे लागणार आहे. पोलिसांच्या कारवाईचा बडगा त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.