शेवटच्या दिवशी ७१५ नामांकन दाखल

उद्या होणार छाननी

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
अमरावती, 
municipal-corporation-election : महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या मंगळवार शेवटच्या दिवशी सात झोन कार्यालयात एकूण ७१५ नामांकन अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण १०२३ अर्ज दाखल झाले. बुधवारी अर्जाची छाननी होईल. मंगळवारी दुपारी ३ वाजपर्यंत मनपाच्या सातही झोन कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होती. झोन १ - १२७, झोन २ - १०४, झोन ३ - ९०, झोन ४ - १४९, झोन ५ - ९२, झोन ६ - ४३, झोन ७ - ११० असे एकूण ७१५ अर्ज दाखल झाले. यापूर्वी ३०८ अर्ज दाखल झाले होते. आता एकूण १०२३ अर्ज प्राप्त झाले आहे. या सर्व अर्जाची उद्या छाननी होईल. १ व २ जानेवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ३ जानेवारीला अंतिम यादी जाहीर होईल.
 
 
amt
 
 
 
//डॉ. भरत बस्तेवाड मुख्य निवडणूक निरीक्षक
 
 
डॉ. भरत एन. बस्तेवाड यांची अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून राज्य निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे.
 
 
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक निरीक्षकांच्या नेमणुकीबाबत तसेच त्यांच्या कार्यकक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना २९ डिसेंबर रोजी आदेशान्वये निर्गमित केल्या आहेत.
 
 
आगामी अमरावती महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन, निवडणूक प्रक्रियेवर काटेकोर नियंत्रण व प्रभावी देखरेख राहावी यासाठी नागपूर येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त डॉ. भरत एन. बस्तेवाड यांची अमरावती महानगरपालिकेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०८२६७००३५ असा आहे.
 
 
राज्य निवडणूक आयोगाच्या २९ डिसेंबरच्या आदेशात नमूद केलेल्या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्याबरोबरच, विशेषत्वाने आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, निवडणूक खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा गैरवापर रोखणे, तसेच मतदारांवर थेट अथवा अप्रत्यक्ष प्रभाव टाकणार्‍या वस्तू, सवलती किंवा प्रलोभनांचे वाटप रोखणे या महत्त्वाच्या बाबींवर मुख्य निवडणूक निरीक्षक विशेष लक्ष देणार आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार, नियमभंग अथवा आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, यासाठी संबंधित सर्व यंत्रणा, अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क राहून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.