सेलूत घरात कोंडून पळविले मौल्यवान साहित्य; एकाच रात्री ३ घरांना केले लक्ष्य

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
selu-theft-case : सेलू शहरात वेगवेगळ्या भागांतील तीन घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी झोपेत असलेल्या नागरिकांना घरातच कोंडून चोरट्यांनी टीव्हीसह रोख रकम व मौल्यवान साहित्य लंपास केले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.  ही घटना आज मंगळवार ३० रोजी सकाळी उघडकीस आली.
 
 
संग्रहित फोटो
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री रेहकी मार्गावरील गेंदलाल जेवरे, डुकरे गुरुजी तसेच शहरातील मुख्य वस्तीत असलेल्या एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. एका घरात झोपेत असलेल्या कुटुंबीयांना बाहेर खोलित कोंडून ठेवले. त्यानंतर टीव्ही, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. सकाळी ६ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, काही भागात नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. संशयास्पद हालचाल लक्षात घेत नागरिकांनी आरडाओरड केल्याने चोरटे पसार झाले.
 
 
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत असून, तातडीने कडक उपाययोजना करून शहरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसून चौकशी सुरू असल्याची माहिती सेलू पोलिसांकडून सायंकाळी मिळाली.