क्रिकेटमधील संघर्षानंतर सूर्यकुमार यादव तिरुपतीत!

    दिनांक :30-Dec-2025
Total Views |
तिरुपती,
Suryakumar Yadav in Tirupati खराब फॉर्ममुळे सातत्याने चर्चेत असलेला भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी वर्षाचा शेवट अध्यात्मिक वातावरणात करण्याचा निर्णय घेतला. वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने त्यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे असलेल्या तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतले. या वेळी त्यांच्या पत्नी देविशा शेट्टीही त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. दोघांनीही मनोभावे पूजा करून भगवान वेंकटेश्वरांचे आशीर्वाद घेतले. सूर्यकुमार यादव यांच्या मंदिर भेटीसाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दर्शनादरम्यान मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा रेशमी शाल देऊन सन्मान करण्यात आला. काही काळ मंदिरात शांततेत पूजा केल्यानंतर दर्शन पूर्ण झाले. या भेटीचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये त्याची मोठी चर्चा सुरू आहे.
 

suryakumar yadav in tirupati 
दर्शनावेळी सूर्यकुमार आणि देविशा पारंपरिक पोशाखात दिसून आले. सूर्यकुमार यांनी गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता, तर देविशा पिवळ्या रंगाच्या साडीत दिसत होत्या. मंदिराकडे जात असताना चाहत्यांनी त्यांना वेढले होते. गर्दी असूनही सूर्यकुमार यांनी संयम राखत चाहत्यांसोबत फोटो काढले आणि कोणालाही त्रास होऊ नये याची काळजी घेतली. त्यांच्या साधेपणा आणि शांत स्वभावाचे चाहत्यांकडून विशेष कौतुक होत आहे. ही सूर्यकुमार यादव यांची तिरुपतीची पहिली भेट नाही. याआधीही २०२३ साली त्यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिरात दर्शन घेतले होते आणि त्या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर सूर्यकुमार यादव सध्या कठीण टप्प्यातून जात आहेत. आशिया कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही त्यांना अपेक्षित धावा करता आल्या नाहीत. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा फॉर्म चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, अलीकडेच दिलेल्या प्रतिक्रियेत सूर्यकुमार यांनी आपण कठोर मेहनत करत असून लवकरच मोठी खेळी पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.