नवी दिल्ली,
The CDS-1 results have been announced. संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा सीडीएस-१ २०२५ चा अंतिम निकाल जाहीर केला असून, लष्करात अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेकडो उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. लेखी परीक्षा, सेवा निवड मंडळाची (SSB) मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी हे सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या एकूण ५३५ उमेदवारांची गुणवत्ता यादी आयोगाने प्रसिद्ध केली आहे. या निवड यादीत ४७३ पुरुष आणि ६२ महिला उमेदवारांचा समावेश असून, त्यांची निवड भारतीय लष्कराच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) येथे होणाऱ्या प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. हे उमेदवार १२३ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (पुरुष) आणि ३७ व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (महिला, नॉन-टेक्निकल) अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत.

UPSC ने स्पष्ट केले आहे की, लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची SSB मार्फत सखोल मुलाखत घेण्यात आली. या प्रक्रियेत त्यांचे नेतृत्वगुण, मानसिक क्षमता, निर्णयक्षमता आणि संघभावना यांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर लष्करी सेवेसाठी आवश्यक असलेली शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यासाठी वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. तथापि, आयोगाने हेही नमूद केले आहे की निवड ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. पुढील टप्प्यात लष्कर मुख्यालयाकडून उमेदवारांची जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.