फ्लोरिडा,
Trump praises the Israeli Prime Minister इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. गाझा युद्धबंदी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये झालेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये प्रादेशिक सुरक्षा, हमास आणि इराणसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहू यांचे जाहीरपणे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वाला युद्धकाळातील निर्णायक नेतृत्व असे संबोधले. नेतान्याहू यांनी इस्रायलला अत्यंत कठीण आणि धोकादायक काळातून सुरक्षितपणे बाहेर काढले असल्याचे ट्रम्प म्हणाले. जर त्या काळात चुकीचा पंतप्रधान असता, तर आज इस्रायल नकाशावरही नसता, असे विधान ट्रम्प यांनी केले. यावेळी त्यांच्या शेजारी उभे असलेले नेतान्याहू हे हसत मान हलवत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

ट्रम्प यांनी गाझा युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की शांतता प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी हमासने शस्त्रसंधी स्वीकारत आपली शस्त्रे खाली ठेवणे आवश्यक आहे. युद्धबंदीला विलंब होत असल्याबद्दल व्हाइट हाऊसच्या काही अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून, इस्रायल आणि हमास दोन्ही बाजू जाणीवपूर्वक दुसऱ्या टप्प्यात जाण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नेतान्याहू यांनी या बैठकीत इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दाही ठामपणे उपस्थित केला. इराणकडून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत अमेरिकेने अधिक कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. इस्रायली सरकारचे प्रवक्ते शोश बेद्रोसियान यांनी स्पष्ट केले की युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात नेतान्याहू यांचे प्रमुख उद्दिष्ट हमासचे संपूर्ण नि:शस्त्रीकरण आणि गाझा पट्ट्याचे सैनिकीकरण संपवणे हे आहे
दरम्यान, हमासची सशस्त्र शाखा इज्जेदिन अल-कसम ब्रिगेड्सने आपली भूमिका पुन्हा ठामपणे मांडली आहे. त्यांनी जाहीर केले की जोपर्यंत कब्जा कायम आहे, तोपर्यंत ते शस्त्रे खाली ठेवणार नाहीत. एका व्हिडिओ संदेशातून त्यांनी हा इशारा दिला असून, त्याच वेळी हमासने आपले दीर्घकाळचे प्रवक्ते अबू ओबेदा यांच्या निधनाचीही पुष्टी केली आहे. इस्रायलच्या म्हणण्यानुसार, ३० ऑगस्ट रोजी गाझामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात ते मारले गेले. नेतान्याहू यांचा हा दौरा पाम बीचमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक हालचालींचा भाग मानला जात आहे. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशीही रशिया-युक्रेन युद्धाबाबत चर्चा केली होती. या पार्श्वभूमीवर ट्रम्प–नेतान्याहू भेटीला केवळ द्विपक्षीय नव्हे, तर जागतिक राजकारणाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.