वर्धा,
classical-music-sabha : येथील ज्येष्ठ संगीत साधक स्व. शामराव मुळे स्मृतीत शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन चिरंजीव विजय मुळे यांच्या वतीने स्व. शामराव मुळे स्मृती प्रतिष्ठानतर्फे स्व. शामराव मुळे स्मृती संगीत सभेचे आयोजन शनिवार २७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले होते. गायक अजित कडकडे यांचे शिष्य डॉ. अमित लांडगे यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय, नाट्य तसेच भतिगीत गायन सादर केले.

या गायन सभेची सुरूवात राग किरवाणी मधील ख्याल गायनाने झाली. त्यानंतर राग पहाडी मधील ठुमरी ‘बातों बातों में बित गई रात रे’ सादर केले. यानंतर गुरूंचे गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांचं नाट्यपद ‘शब्दावाचून कळले सारे’ तर गुरू अजित कडकडे यांचं निघालो घेऊन दत्ताची पालखी हे भतिगीत सादर केले. यानंतर नाही पुंण्याची मोजणी, चला हो पंढरी जाऊ जीवाच्या जीवलगा पाहू, गणगण गणात बोते म्हणूनी जाऊ या शेगावाला, साई साई साई साई भज ले रे बंदे, कमलनयन वाले राम, श्रीराम हो, छत आकाशाचे आपुल्या घराला, काटा रूते कुणाला अशा रचना एकापाठोपाठ एक प्रस्तुत झाल्या. त्यानंतर एक गवळण ठकविल्या गौळणी हरीने सादर करण्यात आले. यामध्ये मराठी, कानडी, कोकणी, गुजराती, मुस्लिम अशा पाच वेगवेगळ्या गवळणी, वेगवेगळ्या भाषेत आणि वेगवेगळ्या रागांत हरीची आळवणी करत अतिशयच सुरेख ही गवळण रंगली.
संगीत सभेचा शेवट प्रथेनुसार भैरवीतील किती आनंद रे आनंद या झोपडीत माझ्या आणि कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या दोन रचनांनी झाला. मार्दवपूर्ण आवाज, छान दमसास, सुरेख आलाप, खणखणीत ताना अशा सगळ्याच बाजूंनी अमितचं गाणं ऐकणं हा सर्वांगसुंदर अनुभव ठरला. संचालन साधना उमाळकर यांनी केले.