तभा वृत्तसेव
यवतमाळ,
kumar-chinta : जिल्ह्यात 2025 हे वर्ष कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने निर्णायक ठरले असून गुन्हेगारीच्या विविध प्रकारांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी मंगळवार, 30 डिसेंबर रोजी झालेल्या पत्रपरिषदेत दिली. पुढे बोलताना अधीक्षक चिंता म्हणाले, 2024 मध्ये जिल्ह्यातील एकूण गुन्ह्यांचे प्रलंबित प्रमाण 23 टक्के होते. मात्र 2025 मध्ये पोलिसांच्या प्रभावी कामगिरीमुळे हे प्रमाण थेट 7 टक्यांंपर्यंत खाली आले आहे. शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये तब्बल 19.60 टक्केघट नोंदविण्यात आली आहे.

कम्युनिटी पोलिसिंग, प्रतिबंधात्मक उपाययोजना, तडीपार कारवाई तसेच एमपीडीए अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमुळे खुनाचा प्रयत्न व दुखापतीसंबंधी गुन्ह्यांमध्येही घट झाली आहे. मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 9 टक्यांनी घट झाल्याची नोंद पोलिसांनी दिली. फूट पेट्रोलिंग, रात्रगस्त आणि सराईत गुन्हेगारांवर लक्ष केंद्रीत केलेल्या मोहिमांमुळे जबरी चोरीसारख्या स्ट्रीट क्राइममध्ये 41 गुन्ह्यांची घट झाली आहे. चोरी व घरफोडीचे प्रकारही कमी झाले असून, सायबर गुन्ह्यांबाबत राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमांमुळे फसवणुकीच्या घटनांवर आळा बसला आहे.
संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर पावले उचलत पोलिसांनी मोक्काअंतर्गत 31 आरोपींविरुद्ध कारवाई केली. भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 111 व 112 अंतर्गत चार टोळ्यांमधील 25 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. एमपीडीए अंतर्गत 27 प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मपोका व अन्य कायद्यांन्वये 46 जणांना जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले. अंमली पदार्थविरोधी कारवाईत 52 आरोपींना अटक करून गांजा व एमडी अंमली पदार्थ असा सुमारे 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शस्त्र अधिनियमांतर्गत अवैध अग्निशस्त्रांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून अवैध गुटखा व वाळू तस्करीविरोधातही कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हरवलेल्या व्यक्तींच्या शोध मोहिमेत पोलिसांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. 2024 अखेर प्रलंबित आणि 2025 मध्ये नव्याने नोंदविण्यात आलेल्या अशा एकूण 3035 व्यक्तींंपैकी 2396 जणांचा शोध घेण्यात आला असून, वर्षअखेर केवळ 639 प्रकरणे प्रलंबित आहेत. विशेष मोहिमा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे 2025 मध्ये जिल्ह्यात गुन्हेगारीवर ठोस नियंत्रण मिळाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. महिलांची सुरक्षा, संघटित गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका आणि मानवी दृष्टीकोनातून केलेली कामगिरी यामुळे पोलिसांची कार्यक्षमता अधोरेखित झाल्याचे यावेळी पोलिस अधीक्षक म्हणाले.