अमरावती,
amravati-news : उमेदवारी नाकारल्याने व इतर पक्षातून आलेल्यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील असंतुष्टांनी बुधवारी दुपरी छाननीदरम्यान राजापेठ झोन कार्यालयासमोर चांगलाच तमाशा केला. संतप्त कार्यकर्त्यांनी भाजपचे निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर, प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व दिनेश सुर्यवंशी यांच्याशी बाचाबाची केली. संतप्त कार्यंकर्त्यांचा रोष बघून अखेर या नेत्यांनी तेथून निघून जाणेच पसंत केले.

झोन कार्यालयात बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू होती. काही अर्जांवर आक्षेप घेण्यात आल्याने व अपक्ष उमेदवारी दाखल करणार्यांनी त्यांचे अर्ज मागे घ्यावेत, अशी समजूत घालण्यासाठी जयंत डेहनकर, दिनेश सुर्यवंशी व शिवराय कुळकर्णी राजापेठ झोन कार्यालयात आले होते. यादरम्यान तिथे उपस्थित असलेले संगम गुप्ता, सचिन डाके यांनी चांगलाच संताप व्यक्त करीत या नेत्यांना धारेवर धरले. प्रभाग क्रं. ११ फ्रेजरपुरा - रुख्मिणीनगर येथून भाजपने नवख्याला आणि प्रभाग क्रं. १२ स्वामी विवेकानंद - बेलपुरा येथून काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रदीप हिवसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या मुळ व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप करीत त्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे तिथे काही वेळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती बघून भाजपाच्या तिनही नेत्यांनी संतप्त कार्यकर्त्यांना राजापेठ येथील भाजपा कार्यालयात येण्यास सांगून तेथून काढता पाय घेत गराड्यातून सुटका करून घेतली. इकडे भाजप कार्यालयात पोहोचलेल्या कार्यकर्त्यांना काही वेळ समजविले. त्यानंतर नेते मंडळी निघून गेली.
//शक्ती महाराजांसोबत शाब्दिक वाद
संतप्त भाजपा कार्यकर्त्यांसोबत आलेले शक्ती महाराज यांनीही तीव्र शब्दात भावना व्यक्त करण्यास सुरूवात केली. त्यामुळे वातावरण आणखीनच तापू लागले. ते भाजपावर आगपाखड करीत असताना प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी त्यांना तुमचा भाजपसोबत काय संबंध?, अशी विचारणा करून प्रत्यूत्तर देण्यास सुरूवात केली. त्यांचा आवेश बघून शक्ती महाराज यांनी स्वतःला आवर घातला.
काँग्रेसीला उमेदवारी दिल्याचा संताप
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भाजपमध्ये काम करीत आहोत. हिंदुत्वासाठी विविध आंदोलनात सहभागी झाल्याने कोर्ट केसेस आमच्यावर दाखल आहेत. प्रत्येक निवडणुकीतही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करीत आलोत. महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी एवढीच माफक अपेक्षा केली होती. निष्ठावंताना डावलून मोदींना शिवीगाळ करणार्या काँग्रेसींना उमेदवारी देण्याचे काम केल्या गेले. त्याचा हा राग असल्याचे भाजपा कार्यकर्ते संगम गुप्ता यांनी सांगितले.