वाशीम,
yogesh-kumbhejkar : पर्यावरण संरक्षणासोबतच शाश्वत विकासासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढविणे ही आजच्या काळाची अत्यंत गरज असून, सौर ऊर्जेच्या वापरावर भर द्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्त नियोजन भवन येथे आयोजित ऊर्जा बचत —काळाची गरज, ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व व सध्याची शासकीय धोरणे या विषयावरील कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, कृषी उपसंचालक हिना शेख, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी प्रफुल्ल खंडारे, महाऊर्जा जिल्हा व्यवस्थापक विजय काळे, ऊर्जा व्यवस्थापन परीक्षक अच्युत मेहेंदळे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले की, अनेक शासकीय कार्यालयांना वाढत्या वीज देयकांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. शासकीय इमारतींवर सौर ऊर्जेचा वापर केल्यास वीजबिलात मोठी बचत होऊन ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करता येईल. ऊर्जेची बचत ही केवळ गरज नसून जबाबदारी आहे. दैनंदिन जीवनात छोटे-छोटे उपाय अवलंबल्यास मोठ्या प्रमाणात ऊर्जा संवर्धन साध्य होऊ शकते. भविष्यात विजेची मागणी वाढणार असल्याने आजपासूनच ऊर्जा बचतीची सवय लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी सौर व हरित ऊर्जेचा स्वीकार करून हरित व उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
निवासी उपजिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले की, प्रदूषणमुक्त ऊर्जा मिळविणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येला तोंड देण्यासाठी ग्रीन एनर्जीचा वापर वाढवावा लागेल. लहान उपाययोजनांतूनही प्रभावी ऊर्जा संवर्धन शय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ऊर्जा व्यवस्थापन परीक्षक श्री. मेहेंदळे यांनी वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि वाढत्या ऊर्जा गरजांमुळे पारंपरिक ऊर्जास्रोतांवर ताण वाढत असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जा हा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय असून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले. ऊर्जा बचतीचा वसा जपण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विजय काळे यांनी महाऊर्जेच्या विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. कार्यशाळेच्या शेवटी उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांनी ऊर्जा बचतीची प्रतिज्ञा घेतली.