पुढच्या पावलाची ऊर्जा!

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
अग्रलेख
 
happy new year या विश्वामध्ये पृथ्वीसारखे सौंदर्य, सजीवता आणि वैविध्यता असलेला आणखी कोणी ग्रह, तारा असेल की नाही, माहीत नाही. पण पृथ्वीवरचा प्रत्येक सजीव हा भाग्यवानच म्हटला पाहिजे. कारण, अन्यत्र कोठेही कोणाच्याही वाटणीस आलेले नाही असे जीवन, म्हणजे जगणे अनुभवण्याचे भाग्य त्याला मिळाले आहे. तो कोणत्याही रूपाने जन्माला आलेला असला, तरी त्याच्या आयुष्यावर त्याचे नेहमीच प्रेम असते आणि आपल्या वाटणीला आलेले आयुष्य जपण्यासाठी तो सदैव धडपड करत असतो. सजीवांचे वास्तव्य असलेल्यांच्या या जगात माणसाचा जन्म लाभणे हे दैवदुर्लभ भाग्य मानले जाते. कारण या सृष्टीमध्ये असंख्य सजीवांना निसर्गाने जन्म दिलेला असला, तरी मनुष्यजीवावर मात्र त्याची विशेष माया आणि मेहेरबानीदेखील आहे. अन्यांच्या जगण्यावर कायमच असुरक्षिततेचे सावट दाटलेले असते आणि त्या सावटाखाली वावरतानाही, सुरक्षित राहण्यासाठी आणि आपल्या वाटणीला आलेल्या जन्माची पालखी वाहण्यासाठी पुढची पिढी तयार करण्यासाठी धडपडणे एवढाच त्या अन्य सजीवांच्या जगण्याचा उद्देश असतो. माणसाचे जगणे मात्र याहून बरेच वेगळे असते. केवळ जन्माला आल्यापासून मृत्यू येईपर्यंतचे आयुष्य म्हणजे जगणे नाही, तर जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यानच्या वाटचालीत जे काही आयुष्य वाट्याला आलेले असते, त्याचे सोने करण्यासाठी धडपडणे हे खरे जगणे असते हे माणसाएवढे अन्य कोणाही सजीवास माहीतदेखील नसते.
 

न्यू  year  
 
 
म्हणून माणसाचा जन्म हा अन्य कोणत्याही सजीवाहून श्रेष्ठ मानला जातो, कारण तसे आयुष्य पृथ्वीवरच्या अन्य कोणा अन्य सजीवास लाभलेले नसते आणि पृथ्वीबाहेरच्या विश्वात सजीव आहेत किंवा नाही यांचाच अजून शोध सुरू असल्याने, अन्यत्र कोठे माणसाएवढा प्रगत सजीव सापडण्याची शक्यताही नसते. म्हणूनच, जन्माला आल्यानंतर सुरू होणारा प्रवास हा खरे तर अज्ञाताचा प्रवास आहे हे माहीत असूनही, त्या प्रवासाच्या वाटेवर आनंदाचे मळे फुलविण्याचा माणसाचा प्रयत्न सतत सुरू असतो. कधी कधी त्याचीही स्पर्धा सुरू होऊन आपला मळा अधिक सुशोभित करण्याच्या हट्टापायी अन्यांचे मळे उद्ध्वस्त करण्याची दुर्बुद्धी कोणा एखाद्यास सुचत असेलही, पण कोठेतरी, कोणाचे तरी आनंदाचे मळे फुलविणे हा त्यामागचाही हेतू दुर्लक्षित करता येत नाही.
सुखाच्या आणि समाधानाच्या वाटचालीत अनेकदा वेडीवाकडी वळणे लागतात, चढउतार लागतात, कधी चालताना दमछाकही होते. या प्रवासाच्या एखाद्या टप्प्यावर अनेक रात्री अनुभवाव्या लागतात, पण ही रात्र संपली की उद्या पुन्हा नवा सूर्य उगवणार आहे आणि नवा दिवस सुरू होऊन त्याच्यासोबत मिळणारी नवी ऊर्जा घेऊन नव्या उमेदीने पुढचा प्रवास करणार आहोत, हेही प्रत्येकास ठावूक असते. सूर्य मावळला की अंधार पडणार आहे आणि रात्र संपली की अंधारही संपून उजेडाची तिरीप पाहायला मिळणार आहे, या विश्वासाने चालताना अंधारवाटेवरदेखील पावले अडखळत नाहीत आणि मागे हटत नाहीत. पुढे पडणाèया प्रत्येक पावलासोबत कधी सहजपणे, कधी खडतरपणे, कधी एकाकीपणे, तर कधी कुणाच्या आधाराने, प्रवासाची ही अज्ञात वाट चालत राहावी लागते. वाटेवरच्या अडथळ्यांची, वळणांची किंवा चढउतारांची पर्वा न करता चालत राहणे हेच जगणे असते. त्या चालण्याच्या प्रत्येक पावलावर आनंद उधळावा आणि तो एकमेकांसोबत वाटून घ्यावा. यातूनच प्रवास सुखकर होईलच, पण आपल्यासोबत चालणारे, आपल्या आसपासचे अशाच प्रवासातले वाटसरूदेखील आनंदाने पुढची पावले टाकतील आणि जगण्यातील आनंदाच्या अनुभवाने सुखावतील.
खरे म्हणजे, या वाटचालीसोबत पाठीवर घेतलेला दिवसाचा भार आपण नेहमीच आनंदाने वाहत असतो. त्या वाटचालीला साथ देणारा सूर्य दररोजच उगवतो आणि मावळल्यानंतर होणाऱ्या रात्रीचा अंधार संपून नवा दिवस सुरू होणार याची आपल्याला खात्रीही असते. म्हणूनच, कोणताही एखादा मावळता दिवस किंवा कोणताही एखादा नव्याने उगवणारा दिवस निसर्गाच्या नजरेत सारखाच असतो. त्यावर वेगळेपणाचा साज आपण, माणसांनी चढविलेला असतो. कारण त्या वेगळेपणाचा साज चढवून सजविला गेलेला दिवस वाटचालीतील आनंदाला नवी उमेदही देत असतो. संस्कृतीच्या संस्कारांनी संपन्न झालेल्या समाजाच्या जगण्याच्या प्रत्येक दिवसाची सुरुवातच पृथ्वीच्या स्तुतिस्तोत्राने होते आणि मावळल्यानंतरच्या नव्या दिवसाच्या प्रतीक्षेचा अंधारलेला काळदेखील पृथ्वीची प्रार्थना करून सरतो, त्यांना अशा एखाद्या दिवसाच्या वेगळेपणाचे अप्रूप असतेच असे नाही. पण जेव्हा आनंद वाटून घ्यायचा हे ठरलेलेच असते, तेव्हा जगाच्या जल्लोषाकडे त्रयस्थपणे पाहात राहण्याहूनही, त्यांच्या आनंदाची काही फुले आपल्या आसपासही उधळली गेली तर त्यात गैर काहीच नाही. म्हणूनच, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला, काही काळासाठी तरी जुन्याचा विसर पडतो. ते सहजपणे होत जाते. कारण, ज्याला जगभरातील मनुष्यमात्राने नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येचा साज चढविलेला असतो, त्या वर्षअखेरीचा दिवस हा केवळ जल्लोषाचा नसतो. सरलेल्या काळातील कडू गोड आठवणींतून समाधानाचे धागे वेचून ते एकत्र करण्याचा व नव्या वाटचालीच्या वस्त्रामध्ये त्या धाग्यांची नक्षी सजवून पुढची वाटचाल सजविण्याचा सण म्हणून अशा दिवसाकडे पाहावयास हवे. अनुभवांनी भरलेल्या प्रवासातले एक पाऊल पार पडले, याचा आनंद साजरा करावा आणि पुढच्या पावलाची उमेद गाठीशी बांधावी, हाच त्या दिवसावर दाटलेल्या वेगळेपणाच्या जाणिवांचा हेतू असावा. आपल्याला पुढेच चालावयाचे आहे, हे नक्की असल्याची खात्री झाली, की पुढचा प्रवास आनंदाचा कसा होईल याची गणिते आखता येतात. तसे केले तरच पुढच्या प्रवास सोपा होईल, ही खूणगाठ मनाशी पक्की असणे कधीही चांगलेच!
तसे पाहिले, तर आपणा भारतवासीयांसाठी सांस्कृतिकदृष्ट्या आजच्या दिवसाचे वेगळेपण जाणवावे असेही नाही. अशा आनंदाची उधळण करण्यासाठी आपल्या संस्कृतीने अनेक सण, सोहळ्यांची सजावट करून आपल्या परंपरेची पालखी अगोदरपासूनच सजविलेलीही आहे. ती पालखी खांद्यावर घेऊनच जो समाज भविष्याची वाटचाल आनंददायक होण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो, सहकार्याच्या, बंधुभावाच्या आणि एकतेच्या भावनेने परस्परांस सोबत देत राहतो, त्या समाजासाठी डिसेंबरचा अखेरचा दिवस किंवा जानेवारीचा पहिला दिवस हे काही सण नाहीतच. तरीही पृथ्वीवरील व्यावहारिक जगाने या दोन दिवसांना काही वेगळेपण बहाल केले असल्याने, त्याकडे पाहणे हा उपचार असला, तरी व्यवहारदेखील ठरला आहे. म्हणूनच, आजच्या दिवशी, मावळत्या वर्षाकडे पाहण्यात आणि नव्या वाटचालीचा अंदाज घेण्यातही काही गैर नाही. सरत्या वर्षात प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावावी अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांच्या शिदोरीनिशी उद्यापासून होणारी नव्या वाटचालीची सुरुवातही, नवी उमेद, नव्या महत्त्वाकांक्षा आणि नव्या जाणिवांनिशी होणार आहे. येत्या पंचवीस वर्षांचा काळ हा आपल्या वाटचालीचा अमृतकाळ असणार आहे. या अमृतकाळाची समाधानी सुरुवात सरत्या वर्षाने करून दिली आहे. म्हणून सरत्या वर्षाला आभारपूर्वक निरोप द्यायलाच हवा! कारण प्रत्येक सरत्या वर्षावर उमटणाèया पाऊलखुणा पुसून नव्या पाऊलखुणा उमटविण्याचा उत्साह हीच आपली उमेद असते. प्रकाशाचा पावलापुरता कवडसाही नवी उमेद देतो आणि उद्याच्या उजेडाच्या दिशेने नव्या उत्साहाने पुढची पावले पडू लागतात.happy new year उद्या सूर्योदय होणारच आहे आणि त्या लख्ख प्रकाशातच आपण पुढचा प्रवास करणार आहोत, याची खात्री सरत्या वर्षाने दिली आहे. आज मागे वळून पाहताना, जगाच्या पाठीवर प्राप्त झालेली प्रतिष्ठा, अंतराळ कवेत घेण्याच्या ईर्ष्येने भारलेली मने, क्रांतीच्या नव्या पर्वातील तरुणाईचा सहभाग, ज्ञान, विज्ञानाच्या क्षेत्रातील चमकदार कामगिरी, अशा अनेक बाबींनी आजपर्यंतच्या वाटचालीची वाट सजविली आहे. या वाटेवर काटेदेखील होते, पण ते दूर करून पुढचे पाऊल टाकण्याची हिंमत सरत्या वर्षाने दिली आहे. म्हणून, आज लौकिकार्थाने साजऱ्या होणाऱ्या सरत्या वर्षाच्या उत्साहात सहभागी होण्यातही काही गैर नाही. कारण, सरत्या काळाने दिलेल्या अनुभवांच्या शिदोरीसाठी त्याचे आभार तर मानायलाच हवेत.