जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट...१०० हून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत!

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
जम्मू,
High alert in Jammu and Kashmir. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्कतेत ठेवण्यात आल्या आहेत. नियंत्रण रेषेवर वाढत्या हालचाली लक्षात घेता संपूर्ण ७४० किलोमीटर लांबीच्या एलओसीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीमेपलीकडील सुमारे ६० लाँचपॅडवरून शंभरहून अधिक दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही घुसखोरी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला होण्याची शक्यता असल्याने भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा दलांनी सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक केली आहे. डोंगराळ आणि अत्यंत कठीण भूप्रदेशात, सुमारे १३ हजार फूट उंचीवरही अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बीएसएफचे जवान दिवसरात्र पहारा देत आहेत. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त गस्त, ड्रोनद्वारे पाळत आणि आधुनिक उपकरणांच्या मदतीने घुसखोरी रोखण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 

kashmir loc 
दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दी वाढत असलेल्या जम्मू शहरातही सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. मंगळवारी जम्मू बसस्थानकावर एक बेवारस बॅग आढळल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि सुरक्षा दलांनी तातडीने परिसर सील केला आणि प्रवाशांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले. संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली आणि तांत्रिक पथकाच्या मदतीने बॅगची तपासणी करण्यात आली. सखोल तपासणीनंतर बॅगमध्ये कोणताही स्फोटक किंवा संशयास्पद साहित्य नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ती बॅग ताब्यात घेऊन जवळच्या पोलीस ठाण्यात नेली असून ती कोणाची आहे आणि ती तेथे कशी राहिली याचा तपास सुरू आहे. यासाठी बसस्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बसस्थानकावरील वाहतूक आणि प्रवासी सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आल्या. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात सतर्कता कायम ठेवण्यात आली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.