वेध
गिरीश शेरेकर
amravati municipal corporation अमरावती महानगरपालिकेच्या रणधुमाळीतला महत्त्वाचा टप्पा मंगळवारी पूर्ण झाला. महायुती व महाविकास आघाडीत निवडणूक लढविण्याच्या वल्गना करणाèया सर्वच पक्षांनी आपल्या सोयीनुसार जागावाटप करून एकमेकांना धक्के दिले. काही ठिकाणी उमेदवारांची आयात व निर्यात झाली. गेल्या दोन दिवसांपासून अत्यंत हायहोल्टेज ड्रामा अमरावतीत सुरू होता. सर्वांत जास्त गोंधळ महायुतीत पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत भाजपा व शिवसेनेची चर्चा सुरू होती. अखेर दोन्ही पक्षांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला. युतीतला आणखी एक मित्रपक्ष युवा स्वाभिमानला भाजपाने सोबत घेतले. पण, त्यांना फक्त आठच जागा दिल्याने त्यांनी जास्तीचे उमेदवार मैदानात उतरविले आहेत. शिवसेनेने भाजपाने उमेदवारी नाकारलेल्या अनेकांना वेळेवर उमेदवार बनवले. काहींना युवा स्वाभिमानने दिल्या आहेत. दुसरीकडे काँग्रेसने नावापुरत्या काही जागा मित्रपक्ष उबाठाला सोडल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच जागांवर उमेदवार दिले आहे. युतीत बिघाडी पाहायला मिळाली तर आघाडीत काही प्रमाणात समन्वय दिसला.
महापालिका निवडणूक महायुतीतले व महाविकास आघाडीतले पक्ष एकत्र लढतात की वेगवेगळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सर्वांत जास्त घडामोड महायुतीत होती. शिवसेनेने भाजपाला 35 जागांचा प्रस्ताव दिला होता. तो नाकारून भाजपाने फक्त 11 जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यांनी तो प्रस्ताव नाकारून वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली असतानाच त्यांना थांबविण्यात आले. स्थानिक व वरिष्ठस्तरावर चर्चा झाल्यानंतर अखेर शिवसेनेला 16 जागा देण्याचे जवळपास निश्चित झाले होते. पण, त्यांनी 16 प्रभागात प्रत्येकी एक उमेदवार शिवसेनेचा राहील ही अट घातली. भाजपाने ती अमान्य केली. जेथे आमचे उमेदवार विजयी झाले, तेथील एकही जागा आम्ही देणार नाही, अशी भूमिका भाजपाने घेतली. नेमके याच मुद्यावरून भाजपा व सेनेत ठिणगी पडली आणि युती मोडली. भाजपाचे निवडणूक निरीक्षक संजय कुटे यांनी शेवटपर्यंत युती कायम राहील असा प्रयत्न केला. पण, भाजपातल्या अनेकांना सेनेसोबत युती नकोच होती. कारण, गेल्या निवडणुकीत भाजपाने 74 जागा लढल्या व 45 जिंकल्या. युतीत शिवसेनेला व युवा स्वाभिमानला 24 जागा दिल्यावर भाजपाकडे फक्त 50 जागाच शिल्लक राहणार होत्या. इतक्या कमी जागेत भाजपाला गेल्या निवडणुकीतली कामगिरी कायम राखता आली नसती. त्यामुळे भाजापाने सेनेसोबतची युती मोडून फक्त युवा स्वाभिमानला 8 जागा देऊन त्यांच्यासोबत युती केली. आता 67 जागा भाजपा लढणार आहे. युवा स्वाभिमानने सध्या तरी 41 जागांवर उमेदवार उभे केले. भाजपाने सुद्धा स्वाभिमानला दिलेल्या 8 जागांवर आपले उमेदवार अपक्ष म्हणून उतरविले आहे. स्वाभिमानने जास्तीचे उमेदवार मागे घेतले नाही तर भाजपाने अपक्ष म्हणून उतरविले उमेदवार मैदानात कायम राहतील. त्यावरून असे लक्षात येते की, भाजपाची युवा स्वाभिमानसोबत युती राहील की नाही? असा प्रश्न आता चर्चेला आला आहे. तुलनेने महाविकास आघाडीत कुठेही कुरबुर झाली नाही. काँग्रेस व उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व अन्य छोट्या पक्षांनी समन्वयाने मार्ग काढला. काँग्रेस 74 जागा लढविणार आहे.amravati municipal corporation अन्य ठिकाणी सहकारी पक्षांसाठी त्यांनी जागा सोडल्या तर काही ठिकाणी ते मैत्रीपूर्ण लढणार आहे. या सर्व गदारोळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत होता. ‘एकला चलो रे’च्या भूमिकेवर कायम राहत कुठेही गाजावाजा न करता जवळपास 82 ठिकाणी त्यांनी उमेदवार दिले आहेत.
सांगायचा मुद्दा इतकाच की, सर्व पक्षांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहे. अर्जाची छाननी व अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावर प्रत्येक प्रभागातले अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. प्रत्येक प्रभाग आपल्या पक्षासाठी अनुकूल राहावा यासाठी येत्या दोन दिवसांत सर्वच प्रमुख पक्षांकडून प्रयत्न होणार आहे. इतर सर्व पक्षांच्या तुलनेत भाजपासाठी ही निवडणूक आव्हानात्मक आहे. शिवसेना स्वतंत्र लढत असल्याने मतविभागणी होऊन भाजपाला फटका बसेल का? याचे उत्तर सध्या तरी कोणाकडे नाही. गेल्या निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रच लढली होती आणि त्यांचे 7 उमेदवार विजयी झाले होते. यंदा तर शिवसेनाच दुभंगल्याने त्यांच्याही अडचणी आहे. युवा स्वाभिमान व भाजपाची युती कोणते वळण घेते यावर काही प्रभागतली समीकरणे अवलंबून आहेत. यंदा नव्याने तयार झालेला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष संपूर्ण ताकदीने उतरला असल्याने ते कोणाच्या मतांवर डल्ला मारतात, त्याचा फटका नेमका कोणाला बसेल यावर चर्चा होत आहे. एकंदरीतच निवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
9420721225