इस्लामाबादमध्ये असीम मुनीरच्या मुलीचे गोपनीयतेत लग्न!

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
इस्लामाबाद,
Munir's daughter's wedding इस्लामाबादमध्ये अत्यंत कमी प्रसिद्धीमध्ये पाकिस्तानी लष्कराचे फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्या मुलीचे लग्न पार पडल्याची चर्चा आहे. रावळपिंडी येथील पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात हा विवाहसोहळा झाला असल्याचे सांगितले जाते. महनूर असे मुलीचे नाव असून २६ डिसेंबर रोजी अब्दुल रहमान यांच्याशी त्यांचा विवाह झाल्याचा दावा विविध वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. अब्दुल रहमान हे महनूर यांचे पहिले चुलत भाऊ असून फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे पुतणे असल्याचेही नमूद केले जाते.
 

munir 
सुरक्षेच्या कारणास्तव हा विवाह पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लग्नाचे कोणतेही अधिकृत छायाचित्र जाहीर करण्यात आले नाहीत आणि समारंभाबाबत सार्वजनिक माहिती देणे टाळण्यात आले. तरीही पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी वर्तुळातील अनेक मोठी नावे या विवाहाला उपस्थित होती, असे वृत्त आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, पंतप्रधान शाहबाज शरीफ, उपपंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशाक दार, आयएसआय प्रमुख तसेच वरिष्ठ लष्करी अधिकारी या कार्यक्रमाला हजर होते. सुमारे ४०० निमंत्रित उपस्थित असूनही संपूर्ण सोहळा अत्यंत शांत आणि कमी प्रोफाइलमध्ये पार पडल्याचे सांगितले जाते.
 
 
फील्ड मार्शल असीम मुनीर यांचे जावई अब्दुल रहमान यांच्याबाबतही माहिती समोर आली आहे. ते यापूर्वी पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी लष्करी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या राखीव कोट्यातून नागरी सेवेत प्रवेश केला असून सध्या ते सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. असीम मुनीर यांना चार मुली असून महनूर ही त्यांची तिसरी मुलगी आहे. दरम्यान, काही आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये जनरल असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये धार्मिक अतिरेकीपणात वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक समुदायाचा संयम कमी होत चालल्याचेही म्हटले जाते. एशियन न्यूज पोस्टच्या एका अहवालानुसार, पाकिस्तानची लष्करकेंद्री धोरणे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यात, नागरिकांचे संरक्षण करण्यात तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरत आहेत.