मुंबई,
Nusrat Bharuch : बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरुचा अलीकडेच उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या होत्या. त्यांनी महाकालांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले तसेच पारंपरिक भस्म आरतीतही सहभाग नोंदवला. मंदिरातील पुजाऱ्यांनी त्यांचा शाल देऊन सन्मान केला होता. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र, त्यांच्या या कृतीमुळे आता धार्मिक वाद निर्माण झाला असून मुस्लिम धर्माच्या संदर्भातून त्यांच्यावर टीका होत आहे.
ऑल इंडिया जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी नुसरत भरुचाच्या महाकाल मंदिर दर्शनावर नाराजी व्यक्त करत त्यांच्या विरोधात फतवा जारी केला आहे. मौलानांच्या म्हणण्यानुसार, नुसरत यांनी मंदिरात ज्या धार्मिक परंपरा पाळल्या त्या इस्लामच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे त्या शरियतच्या दृष्टीने गुनहगार ठरतात. त्यांनी हे कृत्य गंभीर पाप असल्याचे सांगत नुसरत यांनी असे करू नये होते, तसेच अल्लाहकडे माफी मागावी आणि कलमा पठण करावे, असा सल्लाही दिला आहे. इस्लाममध्ये मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करण्यास परवानगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नुसरत भरुचा मंगळवार, ३० डिसेंबर रोजी महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी भस्म आरतीत सहभाग घेतला आणि महाकालांचे दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने शिवकांत पांडे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नुसरत यांनी महाकालांवरील आपल्या श्रद्धेबद्दल बोलताना दरवर्षी दर्शनासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या याआधीही एकदा महाकाल दर्शनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, नुसरत भरुचा यांनी यापूर्वी शुभांकर मिश्रा यांच्याशी संवाद साधताना आपल्या धार्मिक विचारांबाबत मोकळेपणाने मत मांडले होते. त्यांनी सांगितले होते की, त्यांचा विश्वास प्रामाणिक असून त्यातूनच त्यांना बळ मिळते. जिथे शांती मिळते तिथे प्रत्येकाने जावे, मग ते मंदिर असो, गुरुद्वारा असो किंवा चर्च. आपण नियमित नमाज पठण करतो, प्रवासातही नमाजाची चटई सोबत ठेवतो, असे त्यांनी नमूद केले होते. देव एकच आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत, अशी आपली ठाम भूमिका नुसरत यांनी यावेळी मांडली होती.