कसा झाला दहशतवादी अड्ड्यांचा खात्मा? वीर चक्र विजेत्याचा थरारक खुलासा

    दिनांक :31-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’चे नायक प्रथमच एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात कर्नल कोशांक लांबा, लेफ्टनंट कर्नल सुशील बिष्ट, नायब सूबेदार सतीश कुमार, नायब सूबेदार रत्नेश घोष आणि मेजर जैरी ब्लेज उपस्थित होते. यापैकी लेफ्टनंट कर्नल सुशील बिष्ट हे वीर चक्राने सन्मानित अधिकारी असून, ऑपरेशन सिंदूरदरम्यान सॅटेलाइट प्रतिमांचा सखोल अभ्यास करून त्यांनी दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.
 
 
opration sindoor
 
 
 
लेफ्टनंट कर्नल सुशील बिष्ट यांना पाकिस्तानकडील हालचालींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सॅटेलाइट इमेजेसचा अभ्यास करून दहशतवादी तळ नष्ट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. पाकिस्तानकडून प्रत्युत्तर मिळाल्यानंतरही त्यांनी अदम्य धैर्य दाखवत रात्रीच्या अंधारात कारवाई केली आणि दहशतवादी तसेच त्यांच्या समर्थकांचे ठिकाणे पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या शौर्यासाठी त्यांना वीर चक्र प्रदान करण्यात आले.
 
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की त्यांचे सर्व लक्ष्य दहशतवादी छावण्याच होत्या. ६ आणि ७ मेच्या रात्री काही अत्यंत महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर कारवाई करण्यात आली. पश्चिम सीमेवरील संपूर्ण पट्ट्यात एकूण नऊ महत्त्वाची लक्ष्ये होती, त्यापैकी काही त्यांच्या ताब्यातील होती.
 
आर्टिलरीतील आधुनिकतेबाबत बोलताना लेफ्टनंट कर्नल बिष्ट म्हणाले की उत्तर ते दक्षिण सर्वत्र कारवाई झाली. भारतीय लष्कर आणि आर्टिलरी विभाग आधुनिकतेच्या टप्प्यातून जात असून, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे वापरात येत आहेत. पूर्वी तोफ सज्ज करण्यास २० ते ३० मिनिटे लागत, मात्र आता नव्या तोफांमुळे अवघ्या २ ते ३ मिनिटांत फायरिंगसाठी तयारी होते आणि निश्चित केलेल्या ठिकाणी तत्काळ गोळीबार करता येतो.
 
ऑपरेशन सिंदूरसाठी तयारी करताना लक्ष्यांची अत्यंत सविस्तर माहिती गोळा करण्यात आली होती. लेफ्टनंट कर्नल बिष्ट यांनी सांगितले की हालचाली केवळ रात्रीच्या वेळीच केल्या जात. प्रशिक्षण, नियोजन, तयारी आणि सराव सर्व काही रात्रीच होत असे. परिसराचा इतका बारकाईने अभ्यास केला होता की कोणत्या मार्गाने जायचे, कुठे वळणे येतील आणि कसे नेव्हिगेट करायचे याची पूर्ण माहिती होती. रेकी अचूक करण्यात आली होती आणि ई-मार्किंगही आधीच केलेले होते.
 
फायरिंगनंतर शत्रूकडून प्रत्युत्तर येणार हे गृहीत धरूनच योजना आखली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. लष्करामध्ये याला कंटिन्जन्सी प्लॅनिंग म्हटले जाते. एका ठिकाणी फायर केल्यानंतर तात्काळ त्या भागातून हालचाल करून सर्व तोफा सुरक्षित ठिकाणी हलवण्याची रणनीती आखण्यात आली होती, ज्यामुळे शत्रूच्या प्रत्युत्तराला प्रभावीपणे तोंड देता आले.