तभा वृत्तसेवा
पुसद,
water-tank-overflowing : शहरातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत असताना, दुसरीकडे शहराच्या मध्यवर्ती भागात शुद्ध पेयजल अक्षरशः रस्त्यावर वाहत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुसद नगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचे हे जिवंत उदाहरण सध्या टिळकनगर परिसरात पहायला मिळत आहे. टिळकनगर येथे असलेली तब्बल 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस सातत्याने ओव्हरफ्लो होत आहे. टाकी भरल्यानंतर पंपिंग तत्काळ बंद करणे अपेक्षित असताना, संबंधित कर्मचारी आणि अधिकारी मात्र नेहमीप्रमाणे गाफील असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, शुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण झालेले मौल्यवान पेयजल रस्त्यावरून खळाळत वाहत असून, मोतीनगर बगिच्याच्या समोरील संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे.

पंपिंग पूर्ण झाल्यानंतर टाकीवर नियुक्त कर्मचाèयांनी वेळीच सूचना देणे व पंप बंद करणे ही त्यांची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार पाहता, नगर प्रशासनाला पाण्याची किंमत आणि नागरिकांच्या गरजांशी काहीही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होते. शुद्ध पेयजलाचा असा उघड अपव्यय सुरू असताना प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष रवी देशपांडे यांनी पाणीपुरवठा अभियंता माधव पाटील यांच्याशी संपर्क साधून गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. माहिती देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, ही बाब अधिक संतापजनक आहे.
शहरात सध्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष पदारूढ व्हायचे आहे तर मुख्याधिकारी अतुल पंत यांचे अमरावती येथे स्थानांतरण झाल्याने पुसद नगरपालिकेला सध्या ‘वालीच नाही’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. एकीकडे तहानलेले नागरिक आणि दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वाहून जाणारे पाणी, हा विरोधाभास पुसद नगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. या प्रकाराबद्दल शहरातील नागरिकांत तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.