तभा वृत्तसेवा
दिग्रस,
ramu-pawar-passed-away : दिग्रस शहराच्या सामाजिक, क्रीडा व सार्वजनिक जीवनात आपल्या कर्तृत्वाची अमीट छाप उमटविणारे, सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रामू पवार यांचे मंगळवार 31 डिसेंबरला मध्यरात्री दीर्घ आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.
कबड्डी क्षेत्रात त्यांनी गाजविलेल्या उल्लेखनीय कर्तृत्वाची दखल घेत राज्य शासनाने त्यांना प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले होते. खेळाच्या मैदानावर त्यांनी जिद्द, शिस्त व संघर्षाचे जे संस्कार रुजविले, तेच संस्कार त्यांनी सामाजिक व सार्वजनिक जीवनातही अखंडपणे जपले. सामाजिक व राजकीय जीवनात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली. सामान्य सफाई कामगार ते सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) असा त्यांनी केलेला प्रेरणादायी प्रवास आज कष्टकरी वर्ग, युवक व वंचित समाजघटकांसाठी दिशादर्शक ठरतो. बुधवार, 31 डिसेंबरला दुपारी 3 वाजता येथील हिंदू मोक्षधामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे तीन मुले, दोन मुली आणि मोठा परिवार आहे.