बिहारनंतर आता भाजपाचे मिशन पश्चिम बंगाल

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
दिल्ली वार्तापत्र
bjps mission is west bengal बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाल्यानंतर भाजपाचे लक्ष आता पश्चिम बंगालकडे लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भरधाव निघालेल्या विजयरथाला यावेळी कोणत्याही स्थितीत पश्चिम बंगाल काबिज करायचे आहे.
देशात जी काही मोजकी राज्ये आहेत, ज्यात भाजपाला आतापर्यंत कधीच विजय मिळाला नाही, त्यात पश्चिम बंगाल हे एक आहे. त्यामुळे यावेळी त्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपा करो वा मरो च्या जिद्दीने उतरणार आहे. त्याचे संकेत मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर दिले. गंगा नदी ज्याप्रमाणे बिहारमधून निघून पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करते, त्याचप्रमाणे भाजपाची विजय यात्रा आता पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत त्यात दीदीला (ममता बॅनर्जी) वाहून घेऊन जाईल, असे म्हटले आहे. मोदी यांच्या या प्रतिक्रियेतून पश्चिम बंगाल भाजपासाठी किती महत्वाचे आहे, याची कल्पना येते. बिहारमधील गंगा नदी यशस्वीपणे पार केल्यानंतर भाजपा आता पश्चिम बंगालमधील हुबळी नदी आपल्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहे, असे म्हणावे लागेल.
 

भाजप मोर्चा  
 
 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी मोदी यांनी संसदभवनात पश्चिम बंगालमधील भाजपाच्या खासदारांची भेट घेत त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. देशात पश्चिम बंगाल आणि तामीळनाडू ही दोनच राज्ये अशी आहेत, ज्यात भाजपाला आतापर्यंत एकदाही विजय मिळवता आला नाही. तामीळनाडूच्या तुलनेत गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमधील भाजपाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे, या राज्यात भाजपा प्रमुख विरोधी पक्षाच्या स्थितीत आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा भाजपाला उल्लेखनीय यश मिळाले. त्यामुळे 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या आशा उंचावल्या. मात्र त्यावेळी भाजपाला सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. मात्र 2016 च्या तुलनेत भाजपाच्या मतांत आणि जागांत लक्षणीय वाढ झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 42 पैकी तृणमूल काँग्रेसने 22 तर भाजपाने 18 जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले. तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्या मतांत फक्त 3 टक्क्यांचा फरक होता. तृणमूल काँग्रेसला 43.27 तर टक्के मते मिळाली तर भाजपाला 40.25 टक्के. तृणमूल काँग्रेसला 2 कोटी 47 लाख 56 हजार 985 मते मिळाली, तर भाजपाला 2 कोटी 30 लाख 28 हजार 343 मते मिळाली. याचाच अर्थ भाजपाने राज्यातील आपला जनाधारात चांगलीच वाढ केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीशी तुलना केली तर तृणमूल काँग्रेसच्या या निवडणुकीत 12 जागा कमी झाल्या, तर भाजपाच्या 16 जागा वाढल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने 34 तर भाजपाने 2 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला या निवडणुकीत 4 जागा मिळाल्या.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 29 तर भाजपाला 12 जागा मिळाल्या होत्या. 2019 च्या तुलनेत तृणमूल काँग्रेसच्या 7 जागा वाढल्या, तर भाजपाच्या 6 जागा कमी झाल्या. तृणमूल काँग्रेसने भाजपाच्या तुलनेत 17 जागा जास्त जिंकल्या तरी तृणमुल आणि भाजपाच्या मतांत फार जास्त फरक नाही. तृणमूल काँग्रेसला 2 कोटी 76 लाख 74 हजार 133 मते मिळाली, तर भाजपाला 2 कोटी 34 लाख 31 हजार 81 मते पडली. त्यामुळे यावेळी भाजपाच्या अपेक्षा उंचावणे स्वाभाविक आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षणाचा (एसआयआर) मुद्दा चांगलाच गाजला होता. या मुद्यावरुन विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला होता. पण बिहारच्या सुजाण मतदारांनी एसआयआरच्या बाजूने आपला कौल देत हा प्रयत्न हाणून पाडला. आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुद्यावरुन आकाशपातळ एक करत आहे. काही बुथस्तरीय अधिकाèयांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर पश्चिम बंगालमध्ये भाजपाची ताकद किती वेगाने वाढली, याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. 2011 च्या विधानसभा निवडणुकीत 289 जागा लाढवणाऱ्या भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही, भाजपाला यावेळी 4.06 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीतून ममता बॅनर्जी यांनी राज्यातील डाव्या पक्षाची राजवट उलथून लावत पहिल्यांदा तृणमूल काँग्रेसची सत्ता आणली होती. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 3 जागा जिंकत राज्यात प्रथमच भाजपाने आपले खाते उघडले. यावेळी भाजपाच्या मतांची टक्केवारी 10.16 होती.
2021 च्या विधानसभा निवडणुकीतून तर भाजपाने राज्यात इतिहास घडवला.bjps mission is west bengal या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा आपल्याकडे सत्ता कायम ठेवण्यात तृणमूल काँग्रेसने यश मिळवले असले तरी भाजपाला मिळाला विजय नेत्रदीपक म्हटला पाहिजे. राज्यातील विधानसभेच्या सर्व म्हणजे 293 जागा लढवत भाजपाने 77 जागा जिंकल्या. भाजपाने 74 जागा जास्त जिंकल्या, हा एक विक्रम म्हटला पाहिजे. भाजपाच्या मतांची टक्केवारी 37.97 होती. भाजपाला 2 कोटी 28 लाख 50 हजार 710 मते मिळाली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयाचा हा परिणाम होता. या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 18 जागा जिंकत 2 कोटी 30 लाख 28 हजार 343 मते मिळवली होती. लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यात भाजपाला यश आले. या निवडणुकीतील यशामुळे भाजपा पश्चिम बंगाल विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष झाला. त्यामुळे 2026 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या आशा उंचावल्या आहेत.
भाजपाने कधीपासूनच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना भाजपाने निवडणूक प्रभारी तर त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांना सहप्रभारी बनवले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपासमोर खरे आव्हान सलग तीन विधानसभा निवडणूक जिंकणाèया राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे आहे. ममता बॅनर्जी अतिशय आक्रमक नेत्या आहेत. त्यांचे संपूर्ण राजकारण हे मुस्लिम तुष्टीकरणाचे आहे. त्यामुळे एसआयआरच्या मुद्यावरुन त्या आकाशपातळ एक करत आहे. राज्यात आतापर्यंत 39 बीएलओंचा मृत्यू झाला, असा आरोप करत या बीएलओच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.
देशातील राजकारणात सर्वात धूर्त आणि आक्रमक नेत्या अशी ममता बॅनर्जी यांची ओळख आहे. शरद पवार देशातील सर्वात धूर्त, चाणाक्ष आणि मुत्सद्दी नेते म्हणून ओळखले जातात. पण सात शरद पवार बरोबर एक ममता बॅनर्जी अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ भाजपा नेत्याने व्यक्त केली आहे. यावरुन ममता बॅनर्जी काय आहेत, याची आपण कल्पना करु शकतो. त्यामुळे यावेळची विधानसभा निवडणूक भाजपासाठी अतिशय आव्हानात्मक आहे. मात्र अशा अनेक आव्हानांचा सामना करणे हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या डाव्या हाताचा खेळ आहे, यात शंका नाही.
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817