मुंबई,
death of two tigers in Rani Bagh मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शक्ती नावाच्या वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होतीच, परंतु आता राणीबागेत जन्मलेल्या रुद्र नावाच्या तीन वर्षांच्या नर वाघाचाही मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. रुद्र हा शक्ती आणि करिष्मा या वाघांच्या जोडीचा बछडा होता. प्राथमिक माहितीनुसार, रुद्रचा मृत्यू इन्फेक्शनमुळे झाला असावा; मात्र अधिकृत मृत्यू अहवाल अद्याप न आल्याने नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, रुद्रचा मृत्यू शक्तीच्या मृत्यूपूर्वीच झाला होता. दोन्ही वाघांच्या मृत्यूबाबत प्राणीसंग्रहालय प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केली नसल्याने व्याघ्रप्रेमी संतप्त झाले आहेत. वाघांचे मृत्यू लपवून ठेवण्यामागे नक्की कोणता हेतू आहे, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावर भाजपचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांनी प्रशासनावर थेट सवाल उपस्थित केले आहेत. रुद्र वाघाबद्दल संपूर्ण माहिती जाहीर करण्याची त्यांनी मागणी केली असून, सात दिवसांत भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. शक्ती वाघाच्या मृत्यूनंतर रुद्रच्या मृत्यूची माहिती दडवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.