एआय डेटा सेंटर्सचे विस्तारते विश्व

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
- डॉ. दीपक शिकारपूर
ai data centers डिजिटल डेटा साठवणारी, त्यावर प्रक्रिया करणारी प्रचंड संगणकीय यंत्रणा म्हणजे डेटा सेंटर्स. ती आधुनिक जगाची मेंदू-प्रणाली मानली जाते. तिथे हजारो शक्तिशाली सर्व्हर्स, सुपरकॉम्प्युटर्स, नेटवर्क डिव्हाइसेस आणि स्टोरेज सिस्टिम्स एकत्र काम करतात. प्रचंड डेटा साठवण, मशीन लर्निंग मॉडेल्सचे प्रशिक्षण, डीप लर्निंग प्रक्रिया, क्लाऊड काँप्युटिंग सेवा, रिअल-टाईम डेटा प्रोसेसिंग त्यांची ठळक वैशिष्टये मानता येतात.

AI Deta 
 
 
एकविसाव्या शतकात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही मानवजातीच्या विकासाची एक नवी दिशा ठरली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा सध्याचा परवलीचा शब्द आहे. या तंत्रज्ञानाचा पाया म्हणजे डिजिटल डेटा आणि तो साठवण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड संगणकीय यंत्रणा डेटा सेंटर्स म्हणून ओळखली जाते. विशेषतः एआय डेटा सेंटर्स ही आधुनिक जगाची मेंदू-प्रणाली मानली जाते. ही केंद्रे केवळ माहिती साठवत नाहीत, तर ती विश्लेषित करून भविष्याचे निर्णय घेण्यास मदत करतात. एआय डेटा सेंटर्स म्हणजे अशी अत्याधुनिक केंद्रे, जिथे हजारो शक्तिशाली सर्व्हर्स, सुपरकॉम्प्युटर्स, नेटवर्क डिव्हाइसेस आणि स्टोरेज सिस्टिम्स एकत्र काम करतात. प्रचंड प्रमाणातील डेटा साठवण, मशीन लर्निंग मॉडेल्सचे प्रशिक्षण, डीप लर्निंग प्रक्रिया, क्लाऊड कम्प्युटिंग सेवा, रिअल-टाईम डेटा प्रोसेसिंग ही अशा डाटा सेंटर्सची ठळक वैशिष्टये मानता येतात. हाय-परफॉर्मन्स संगणकप्रणाली, 247 अखंड कार्यप्रणालीने सज्ज अशी ही डेटा सेंटर्स कधीही बंद होत नाहीत. दिवस-रात्र सतत सुरू राहतात. उच्च दर्जाची सुरक्षा प्रणाली, सायबर सिक्युरिटी, बायोमेट्रिक लॉक, फायरवॉल्सचा वापर. प्रगत कूलिंग सिस्टीम्स, सर्व्हर्स गरम होऊ नयेत म्हणून विशेष एअर कंडिशनिंग आणि लिक्विड कूलिंग, ऑटोमेशन आणि रोबोटिक देखभाल, अनेक ठिकाणी रोबोटिक सिस्टीम्स वापरून देखभाल ही या यंत्रणेची आणखी काही वैशिष्टये.
एआय डेटा सेंटर्स जितकी फायदेशीर आहेत, तितकेच पर्यावरणावर त्यांचे गंभीर परिणामही आहेत. प्रचंड वीज वापर ही त्यांची एक महत्वाची मर्यादा ठरते. डेटा सेंटर्स खूप मोठ्या प्रमाणात वीज वापरतात. ही वीज प्रामुख्याने कोळशावर आधारित असते, त्यामुळे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढते. ग्लोबल वॉर्मिंगला चालना मिळते. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे कूलिंग सिस्टीमसाठी प्रचंड प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते. या सेंटर्सचा दुष्काळग्रस्त भागांवर गंभीर परिणाम होतो. डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण करतात, आजूबाजूच्या वातावरणाचे तापमान वाढवते. जुने सर्व्हर्स, केबल्स, इलेक्ट्रॉनिक उपकरणे यामुळे विषारी घटक जमिनीत मिसळतात. भारतामध्ये डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया या योजनांमुळे डेटा सेंटर्सची संख्या वाढत आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई येथे मोठी डेटा सेंटर्स उभी राहत आहेत. भविष्यात ग्रीन डेटा सेंटर्सचा वापर वाढेल. सौर, पवन ऊर्जेचा वापर होईल. पर्यावरणपूरक धोरणे लागू होतील. एआय डेटा सेंटर्समुळे होणारे धोके कमी करण्यासाठी काही उपाय आवश्यक आहेत. सौर, पवन, जलविद्युत नवीकरणीय ऊर्जेचा वापर ग्रीन कूलिंग टेक्नॉलॉजी पाणी बचत करणारी प्रणाली याबाबत यापुढे आग्रही रहावे लागणार आहे. ई-वेस्ट रिसायकलिंग, कार्बन फूटप्रिंट कमी करणे, स्थानिक लोकांना कौशल्य प्रशिक्षण हे ही काही दखलपात्र मुद्दे आहेत.ai data centers भविष्यात एआय डेटा सेंटर्स ही केवळ सर्व्हर ठेवण्याची ठिकाणे न राहता ‘डिजिटल फॅक्टरीज’ आणि ‘इंटेलिजंट ब्रेन्स’ म्हणून काम करतील. येत्या दहा ते वीस वर्षांमध्ये खालील महत्त्वाचे बदल दिसतील. ग्रीन डेटा सेंटर्सचा उदय होणार आहे. भविष्यात बहुतेक डेटा सेंटर्स सौर, पवन व जलविद्युत ऊर्जेवर चालतील. ‘कार्बन-न्यूट्रल’ आणि ‘नेट-झिरो’ डेटा सेंटर्स ही संकल्पना प्रत्यक्षात येईल. भारतासारखा सूर्यप्रकाश विपुल असलेला देश या क्षेत्रात आघाडी घेऊ शकतो. मोठ्या, केंद्रीकृत डेटा सेंटर्ससोबतच लहान, स्थानिक ‘मायक्रो डेटा सेंटर्स’ वाढतील. त्यामुळे डेटा प्रोसेसिंग वापरकर्त्याजवळ होईल, वेग वाढेल आणि इंटरनेटवरील भार कमी होईल. येथे क्वांटम आणि न्यूरोमॉर्फिक काँप्युटिंगची महत्वाची भूमिक असू शकते. भविष्यात क्वांटम काँप्युटर्स आणि मानव मेंदूसारखे काम करणाèया ‘न्यूरोमॉर्फिक चिप्स’ वापरात येतील. यामुळे काँप्युटींगची गती आणि क्षमतांमध्ये अभूतपूर्व वाढ होईल. याच सुमारास ऑटोमेटेड, सेल्फ-हिलिंग डेटा सेंटर्सही आकाराला येतील. उपलब्ध यंत्रणा स्वतःच आपल्या डेटा सेंटर्सचे मॉनिटरिंग, देखभाल आणि दुरुस्ती करतील. त्यामुळे ‘सेल्फ रिपेअरिंग’ सिस्टीम्स सामान्य होतील. यथावकाश केवळ शहरांमध्येच नव्हे तर ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण भागातही डेटा सेंटर्स उभारली जातील. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था डिजिटल युगात सामील होईल. डेटा सेंटर्समुळे अनेक नवीन व्यवसाय संधी निर्माण होत आहेत. या संधी फक्त मोठ्या कंपन्यांसाठी नसून लघु आणि मध्यम उद्योजकांसाठीही खुल्या आहेत.
डेटा सेंटर्सच्या वाढीने अनेक प्रकारचा रोजगारही निर्माण करुन दिला आहे. यामुळे काही प्रकारचे स्टार्ट अप्स उभे राहू शकतात. यातून एआयची सेवा प्रदान करणारे प्लॅटफॉर्म सुरु करता येऊ शकतात. डेटा अ‍ॅनॅलिटिक्स कंपन्या सुरु करुन क्लाऊड-आधारित सॉफ्टवेअर सेवा देता येऊ शकतात. उद्योगानुरुप सोल्यूशन्स (उदा. आरोग्य, शेती, फायनान्स) देता येतील. डेटा सेंटर्ससाठी सहाय्यक व्यवसायही उभे राहू शकतात. डेटा सेंटर्सच्या भोवती ‘इको-सिस्टिम’ तयार होते. उदा. कूलिंग सिस्टीम मॅन्युफॅक्चरिंग, पॉवर बॅकअप सोल्यूशन्स (युपीएस, जनरेटर), फायर सेफ्टी आणि सिक्युरिटी सिस्टीम्स, केबलिंग आणि नेटवर्किंग सेवा. हे व्यवसाय (लघु-मध्यम उद्योगांसाठी) खूप महत्त्वाचे ठरत आहेत. याखेरीज ग्रीन टेक आणि सस्टेनेबिलिटी स्टार्ट अप्स तसेच पर्यावरणीय समस्यांवर उपाय देणाèया कंपन्यांसाठी मोठी संधी आहे. त्याचप्रमाणे ऊर्जा कार्यक्षम कूलिंग टेक्नॉलॉजी, वॉटर रिसायकलिंग सिस्टीम्स, ई-वेस्ट रीसायकलिंग युनिट्स, सौरऊर्जा आधारित डेटा सोल्यूशन्स, प्रशिक्षण आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर यांच्यासाठीही उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. डेटा सेंटर्ससाठी कुशल मनुष्यबळाची गरज वाढत असल्यामुळे प्रशिक्षण संस्था, डेटा सायन्स अकॅडमी, सायबर सेक्युरिटी ट्रेनिंग सेंटर, नेटवर्किंग आणि हार्डवेअर ट्रेनिंग स्कूल हे नवे उद्योजकीय क्षेत्र बनत आहे. ग्रामीण आणि टियर-2/टियर-3 शहरांमध्येही मोठ्या संधी उभ्या रहात आहेत. लहान शहरांमध्ये आता नवी डेटा सेंटर्स उभी राहत आहेत. त्यामुळे स्थानिक सर्विस प्रोव्हायडर, लोकल क्लाऊड होस्टिंग, ग्रामीण डिजिटल सेवा केंद्रे यामधून स्थानिक उद्योजक पुढे येऊ शकतात.
भारतासाठी डेटा सेंटर्स हे केवळ तंत्रज्ञानाचे क्षेत्र नसून राष्ट्रीय विकासाचे सामरिक साधन बनत आहेत. सरकारने डिजिटल इंडिया अभियान, मेक इन इंडिया, डेटा लोकलायझेशन पॉलिसी, नॅशनल स्ट्रॅटेजी अशा अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. यामुळे भारतात डेटा सेंटर्समधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ‘एआय 2030 इंडिया’ उपक्रम ही सरकार-समर्थित योजना आहे. भारताला 2030 पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जागतिक नेता म्हणून स्थान देण्याचा तिचा उद्देश आहे. नैतिक अंमलबजावणी आणि सामाजिक प्रभावावर जोरदार भर देऊन भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये सर्वसमावेशक आणि जबाबदार एआय अवलंब करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एकविसाव्या शतकातील सर्वात प्रभावी तंत्रज्ञान आहे आणि भारताने त्याचा उपयोग करून सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देण्याचा निर्धार केला आहे. ‘एआय फॉर इंडिया 2030’ हे धोरण भारताच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे. भारताकडे काही नैसर्गिक फायदे आहेत. विपुल सूर्यप्रकाश सौर ऊर्जेसाठी भरपूर प्रशिक्षित मनुष्यबळ, तुलनेने कमी कामगार खर्च, मोठा डिजिटल युजर बेस यांचा या दृष्टिकोनातून फायदा घेता येईल. असे असले तरी भारतासमोरील डाटा सेंटर संस्कृतीच्या विस्तारापुढे काही मोठी आव्हाने आहेत. वीज पुरवठ्यातील अस्थिरता (ग्रामीण भागात), पाण्याची वाढती टंचाई, सायबर सिक्युरिटी धोके, कुशल मनुष्यबळ आणि सामान्य लोकांमध्ये आढळणारी डिजिटल दरी या आव्हानांचा या दृष्टीकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे.
भारतात स्टार्टअप संस्कृती वेगाने वाढत आहे. बंगळुरू, हैदराबाद, पुणे, गुरुग्राम हे स्टार्टअप हब्ज होत आहेत. सरकारी आणि खाजगी इनक्युबेशन सेंटर्स तयार होत आहेत. व्हेंचर कॅपिटल आणि एंजल गुंतवणूक वाढत आहे. यामुळे आधारित उद्योजकतेला पोषक वातावरण तयार झाले आहे.
वशशरिज्ञऽवशशरिज्ञीहळज्ञर्रिीीी.लो
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)