कॅलिफोर्निया,
Firing at bookie Rakesh Rajdev's house कॅलिफोर्नियात बुक्की राकेश राजदेवच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदरा गँगने स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. गोदराचा विश्वासू गुंड महेंद्र ढेलानाने सोशल मीडियावरून या हल्ल्याचा दावा केला असून नवीन बॉक्सर नावाच्या फेसबुक प्रोफाइलवरून धमकीची पोस्ट टाकण्यात आली आहे. या धमकीत रोहित गोदरा, गोल्डी ब्रार, काला जठेरी, नरेश सेठी, टिनू हरियाणा, काला राणा आणि लिप्पन नेहरा यांचीही नावे उल्लेखली गेली आहेत. पुढे चेतावणी देण्यात आली आहे की, कोणत्याही देशात पोहोचणे आमच्यासाठी कठीण नाही. देशाशी द्रोह करू नका, नाहीतर अशी शिक्षा करु की पुढच्या पिढ्यांनाही आठवण राहील. सुधारण्याची ही शेवटची संधी आहे; पुढच्या वेळी माफी मिळणार नाही.
दरम्यान, राकेश राजदेव सध्या भारतातील तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात ईडी त्याची कसून चौकशी करत आहे. गुजरात पोलिसांनी २०२२ आणि २०२३ मध्ये त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर बेटिंग अॅप्सशी संबंधित गुन्ह्यांची नोंद केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ईडीने त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून त्याच्या ठिकाणांवर छापे टाकले. मात्र, कारवाईपूर्वीच तो भारतातून फरार झाला. राजदेव हा महादेव अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकरचा निकटवर्तीय असल्याचेही तपासात समोर आले आहे. कॅलिफोर्नियातील गोळीबाराच्या घटनेनंतर या गँगयुद्धाच्या धोक्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता वाढली आहे.