मुंबई,
Gopinath Munde Sanugrah Yojana गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता पूर्णपणे ऑनलाइन मिळणार असून, महाडीबीटी पोर्टलमार्फत अर्ज सादर करण्याची सुविधा आजपासून उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी ही प्रक्रिया डिजिटल करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतात काम करताना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व येण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने या योजनेचे महत्त्व अधिक वाढले आहे.
राज्यात 19 एप्रिल 2023 पासून ही योजना राबवली जात आहे. अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद योजनेत आहे. यापूर्वी ही मदत मिळवण्यासाठी संबंधितांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज व आवश्यक कागदपत्रे द्यावी लागत होती. कागदपत्रांतील त्रुटी आणि प्रक्रिया विलंबामुळे अनेकांना मदत पोहोचण्यास उशीर होत असे. या अडचणी टाळण्यासाठी अर्जप्रक्रिया पूर्णपणे महाडीबीटी पोर्टलवर नेण्यात आली आहे. अपघातग्रस्त शेतकरी किंवा त्यांचे वारसदार आता घरातूनच अर्ज करू शकतील, तसेच अर्जाची स्थितीही पोर्टलवर पाहू शकतील. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास त्याबाबतचा एसएमएस थेट अर्जदारांना पाठवला जाईल, ज्यामुळे शासकीय कार्यालयांचे फेरे टाळले जातील आणि आवश्यक दुरुस्ती ऑनलाइनच करता येईल.
ऑनलाइन अर्ज कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी थेट पोहोचणार असून, तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मंजुरी दिली जाईल. मंजूर झालेली रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. 2025-26 वर्षाकरिता या योजनेसाठी 120 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत 4,359 शेतकरी प्रकरणांमध्ये 88.19 कोटी रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहितीही कृषिमंत्र्यांनी दिली. अभ्यासपूर्ण आणि जलद प्रक्रिया उपलब्ध केल्यामुळे ही योजना आता अधिक कार्यक्षम आणि शेतकरी-सुलभ होणार आहे.