नागपूर,
Chef Vishnu Manohar महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन दि. 12 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नागपूरकर विक्रमवीर सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या उद्घाटन हस्ते होणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने आयोजित व नागपूरच्या माजी जिल्हाधिकारी व सध्या महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव असलेल्या आर. विमला यांच्या मार्गदर्शनात होत असलेल्या या खाद्य महोत्सवात महाराष्ट्रातील विविध भागांतील वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उपलब्ध असतील. नागपूर विभागातील सावजी चिकन किंवा मटण रस्सा, लंबी रोटी, तर्री पोहा आणि संत्री-आधारित मिठाई; पुणे भागातील मिसळ पाव, वडा पाव आणि पुरण पोळी; जळगावातील शेव भाजी, भरित (वांग्याचे भरित) आणि केळीशी संबंधित पदार्थ; मालवणातील मालवणी सीफूड, कोंबडी वडे आणि सोल कढी; औरंगाबाद मधील नान कालिया, डालिंबी उसळ आणि स्थानिक बिर्याणी; तसेच कोल्हापुरी नॉन-व्हेजमधील तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि कोल्हापुरी चिकन किंवा मटण यांचा समावेश असेल. हे पदार्थ महाराष्ट्राच्या समृद्ध पाककृती परंपरेचे प्रतिनिधित्व करतील.
या खाद्य महोत्सवात सातारा, कोल्हापूर, जळगाव,पुणे अमरावती, रायगड या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतर्गत असलेले महिला स्वयंम सहायता समूह सहभागी होणार असून त्यांच्याकडील रुचकर पदार्थांचा देखील गरमागरम आस्वाद घेता येणार आहे.