सिरोंचा,
Mallikarjun Swami Yatra, आरडा गावातील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा व मानाचा समजला जाणारा श्री मल्लिकार्जुन स्वामी यात्रा महोत्सव यंदाही अपार भक्तिभावाने आणि भव्यतेने 7 व 8 डिसेंबर रोजी साजरा होत आहे. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांतून हजारो भाविक आरड्याकडे येऊ लागले असून संपूर्ण परिसर पुन्हा एकदा भक्तीच्या महासागराने ओथंबून वाहणार असल्याचे वातावरण तयार झाले आहे.
आदीकालापासून चालत आलेली ही जत्रा केवळ धार्मिक उत्सव नसून आरडा गावाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. मल्लिकार्जुन स्वामींच्या दर्शनासाठी, मनोकामना व्यक्त करण्यासाठी आणि विशेषतः महिलांमध्ये प्रचंड उत्साह असलेल्या पारंपरिक बोनालू सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. खिर शिजवून सुंदर सजवलेल्या मडक्यात ठेवून तो मडका डोक्यावर वाहात मंदिराभोवती घालण्यात येणार्या प्रदक्षिणेचा पवित्र क्षण अनुभवण्यासाठी हजारो भक्त प्रतिक्षेत असतात. भक्ती, श्रध्दा, निष्ठा, उत्साह आणि परंपरेचा संगम या दिव्य यात्रेत प्रत्येक क्षणी दिसून येतो.
यंदाही यात्रेची सुरुवात सकाळच्या गोदावरी पुण्य स्नानाने होणार असून नदीकाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यानंतर संध्याकाळी मंदिरात अखंडदीप प्रज्वलित करून भक्तीमय वातावरणाची सुरुवात होईल. पटनालू कार्यक्रमाची पारंपारिक धुमश्चक्री संपूर्ण गावात उत्साह निर्माण करणार आहे. रात्री रेकॉर्डिंग डान्सच्या माध्यमातून भाविक आणि नागरिकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम रंगणार असून मंदिर परिसर दिवसभरापासून रात्रीपर्यंत प्रकाशाने आणि भक्तांच्या जयघोषाने उजळून निघणार आहे.
दुसर्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा सोहळा म्हणजे बोनालू. महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामींच्या चरणी खिर अर्पण करण्यासाठी सजविलेले मडके डोक्यावर वाहून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात. दिवसभर मंदिर परिसरात वाहनांची, भाविकांच्या रांगा आणि पुजाअर्चेची लगबग सुरूच राहते. संपूर्ण परिसरात प्रसादाचा सुगंध दरवळत असतो आणि भाविकांच्या तोंडून जय मल्लिकार्जुन स्वामी हा जयघोष अविरत ऐकू येत राहतो.
अशा भव्य आणि विशाल जत्रेत भाविकांची संख्या लक्षात घेता संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभागाने काटेकोर नियोजन करून चोख बंदोबस्त उभारला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली फटींग आणि त्यांचे सहकारी संपूर्ण परिसरात सतत गस्त ठेवून गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, सुरक्षा तपासणी आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वतोपरी दक्षता घेत आहेत. गोदावरी घाटापासून मंदिर मार्गापर्यंत आणि बोनालू सोहळ्याच्या प्रदक्षिणा मार्गापर्यंत सर्वत्र पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.