कारंजा लाड,
Karanja Lad municipal नगरपरिषद निवडणुकीनंतर आता मतमोजणीची अधिकृत घोषणा लांबणीवर पडल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड अनिश्चितता निर्माण झाली आहे. मतदान उत्साहात पार पडले, जनतेने आपल्या पसंतीचा कौलही नोंदवला. मात्र, निकाल उलगडण्यास अजूनही १८ दिवसांचा अवधी शिल्लक असल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली असून, उमेदवार आता आकडेमोड करण्यात व्यस्त आहे.
२ डिसेंबर रोजी कारंजा नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह ३१ नगरसेवक पदासाठी ८८ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. यावेळी २३ हजार २३४ पुरुष,२० हजार ४६३ महिला आणि इतर ४ अशा ७० हजार ३३१ मतदारांपैकी ४३ हजार ७०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत निवडणूक रिंगणातील १२ नगराध्यपदासाठीच्या आणि १२७ नगरसेवकासाठीच्या अशा १३९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद केले. अशातच आता मतमोजणीसाठी १८ दिवसांचा अवधी असल्याने निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्व पॅनेल्स, प्रमुख पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून आकडेमोड सुरू आहे. आपापल्या प्रभागात कोण आघाडीवर असेल, कोण पिछाडीवर जाईल, कोणत्या प्रभागात कोणाचे समीकरण पलटी होईल या सर्वांचा तर्क-वितर्क जोरात सुरू आहे. काही प्रभागांमध्ये जोरदार मतदान झाल्याने निकालात चांदी होण्याची उमेदवारांची अपेक्षा आहे तर काहींमध्ये झालेल्या अल्प मतदानामुळे धोयाची घंटा उमेदवारांसाठी वाजताना दिसत आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी अनौपचारिक आकडे मांडण्यास सुरुवात केली असली तरी मतमोजणीच्या अधिकृत प्रक्रियेपर्यंत कोणताही अंदाज धोयाचा ठरू शकतो, हेही तितकेच खरे.
मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असल्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तापमान वाढले आहे. या दिवशी सकाळपासूनच शहरातील सर्वांचे डोळे मतमोजणी केंद्रावर खिळून राहणार यात शंका नाही. नगरपरिषदेत सत्ता कोणाची येणार? जनतेच्या विश्वासाचा मुकुट कोणाच्या डोयावर ठेवला जाणार? बदल होणार की विद्यमान व्यवस्था टिकणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे काही दिवसांवर येऊन ठेपली आहेत. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या मतमोजणीकडे लागले आहे.