नवी दिल्ली,
Putin in India after four years रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारताच्या दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यासाठी नवी दिल्लीत येत आहेत. ४ ते ५ डिसेंबरदरम्यान होणारा हा दौरा विशेष मानला जात आहे, कारण चार वर्षांनंतर ते प्रथमच भारतात पाऊल ठेवणार आहेत. पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २३ वी भारत–रशिया द्विपक्षीय शिखर परिषद होणार असून संरक्षण, व्यापार, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक मोठे करार या भेटीत अंतिम होण्याची शक्यता आहे.
पुतिन यांचे आगमन व पहिल्या दिवसाचे वेळापत्रक
राष्ट्राध्यक्ष पुतिन ४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता नवी दिल्लीत दाखल होतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांच्या सन्मानार्थ ७, लोक कल्याण मार्ग येथे खास डिनरचे आयोजन करणार आहेत. भारत–रशिया धोरणात्मक भागीदारीच्या २५ वर्षांच्या प्रवासाचे हे विशेष औचित्य असेल.
दुसऱ्या दिवसातील अधिकृत कार्यक्रम
५ डिसेंबरला पुतिन यांचे राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करतील. यानंतर सकाळी ११ वाजता हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यात शिखर परिषद बैठक होणार आहे. या बैठकीत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, ऊर्जा सुरक्षेवरील उपाय, व्यापार वाढ, अवकाश संशोधन, तंत्रज्ञान भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. बैठकीनंतर दोन्ही नेते संयुक्त निवेदन जारी करतील.
व्यवसाय परिषदेतील उपस्थिती
दुपारी ४ वाजता दोन्ही नेते भारत मंडपम येथे भारत–रशिया व्यवसाय मंचाला संबोधित करतील. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला जाणार आहे. दोन्ही देशांदरम्यान कामगार गतिशीलता करार अंतिम टप्प्यात असून बांधकाम, आरोग्यसेवा व आतिथ्य क्षेत्रात भारतीय कामगारांना रशियामध्ये काम करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय, युरेशियन आर्थिक संघासोबत संभाव्य मुक्त व्यापार करार, नागरी अणु क्षेत्रातील सहकार्य, रशियन सैन्यात सेवा करणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षित परतीबाबत चर्चा आणि संरक्षण सहकार्य आणखी मजबूत करण्यासंदर्भातही वाटाघाटी होणार आहेत.
राजकीय मेजवानी आणि प्रस्थान
संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुतिन यांच्या सन्मानार्थ राजकीय मेजवानी देतील. यानंतर, जवळपास ३० तासांचा भारत दौरा पूर्ण करून पुतिन ५ डिसेंबरच्या रात्री रशियासाठी रवाना होतील.