कॅच सुटली, सामना गेला! राहुलची कबुली

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
रायपूर,
Rahul admits to missing catch दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाला 4 विकेटने पराभूत व्हावे लागले आणि 359 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 49.2 षटकांत गाठून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. एडन मार्करमचे शतक, तर मॅथ्यू ब्रीट्झकी आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्या अर्धशतकांनी आफ्रिकेचा परदेशातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग यशस्वी ठरला. या धक्कादायक पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने आपल्या चुकांची कबुली देत पराभवाची प्रमुख कारणे सांगितली.
 
 
kl rahul
 
 
 
सामन्यानंतर राहुलने टॉस हरल्याला सर्वात मोठे कारण ठरवले. मागील 20 वनडेमधील एकही टॉस भारत जिंकू शकला नसल्याचा उल्लेख करत राहुल म्हणाला की, मैदानावर प्रचंड दव असल्याने गोलंदाजांना चेंडू पकडणे कठीण गेले. अशा परिस्थितीत टॉस अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि टॉस हरल्याबद्दल मी स्वतःलाच जबाबदार धरतो, अशी त्याची स्पष्ट कबुली होती. राहुलने फलंदाजीतही काही महत्वाच्या संधी दवडल्या गेल्याचे मान्य केले. विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांची जोडी रंगात असताना स्कोअर 400 च्या दिशेने जाईल असे दिसत होते, परंतु दोघे बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला आणि भारत 358 धावांवरच थांबला. आणखी 20-25 धावा केल्या असत्या तर गोलंदाजांना मदत झाली असती, असेही राहुलने सांगितले
 
.
फिल्डिंगमधील चुका देखील भारताच्या पराभवाचे एक कारण ठरल्या. यशस्वी जयस्वालने मार्करमचा 53 धावांवरचा कॅच सोडला आणि त्यानंतर मार्करमने शतकी खेळी केली. ग्राऊंड फिल्डिंगमध्येही त्रुटी झाल्या, ज्यामुळे अतिरिक्त चौकार गेले आणि दक्षिण आफ्रिकेला लक्ष्य गाठणे सुलभ झाले. आता विशाखापट्टणम येथे होणारी तिसरी वनडे दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. भारताला मालिका जिंकायची असेल, तर रायपूरमधील चुका दुरुस्त करणे अपरिहार्य ठरणार आहे.