राज ठाकरेंचा अचानक दिल्ली दौरा; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Raj Thackeray's Delhi visit राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे वातावरण तापत असताना, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक हालचाल लक्ष वेधून घेत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुतीतील तणाव आणि महाविकास आघाडीत सुरू असलेल्या नव्या समीकरणांच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असतानाच त्यांच्या या दौऱ्याने नवीनच चर्चांना उधाण आले आहे.
 
 

raj thackeray 
 
नगर परिषदांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. अशातच नुकत्याच एका विवाहसोहळ्यात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनपेक्षित भेट घडली होती. त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलारही उपस्थित होते. सुमारे २० मिनिटे झालेल्या या चर्चेमुळे राजकीय चर्चा आणखी रंगल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे दिल्लीला निघत असल्याची बातमी समोर येताच विविध तर्कांना ऊत आला. मात्र, मनसेकडून स्पष्ट करण्यात आले की हा दौरा राजकीय नसून पूर्णपणे कौटुंबिक आहे. राज ठाकरे यांची सून मिताली ठाकरे यांचे भाऊ डॉ. राहुल बोरुडे यांचा विवाह ५ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये होणार असून, त्या सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरे आणि ठाकरे कुटुंबातील काही सदस्य दिल्लीला रवाना होत आहेत.
 
 
दरम्यान, या विवाह सोहळ्याला देशातील अनेक नामवंत राजकीय मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमादरम्यान अनौपचारिक भेटीगाठी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा दौरा राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज ठाकरे पुढील दोन दिवस दिल्लीमध्ये थांबणार असून, ते ६ डिसेंबरपर्यंत मुंबईत परतण्याची शक्यता आहे. राज्यात राजकीय हालचालींना वेग येत असतानाच त्यांच्या या दौऱ्याने वातावरण आणखी तापले आहे.