साधू-संतांना तरी ही झाड तोडलेली पटेल का?

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
नाशिक,
Sayaji Shinde and Tapovan नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात साधूग्राम उभारण्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि राजकीय नेते आक्रमक झाले आहेत. या वृक्षतोडीविरोधात आता अभिनेता सयाजी शिंदे यांनीही रोखठोक भूमिका घेतली आहे. सयाजी शिंदेंनी विचारले की, ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू-संतांना तरी ही झाडं तोडलेली पटेल का? या प्रश्नावरून त्यांनी वृक्षतोडीविरोधात आपली तीव्र भावना व्यक्त केली.
 
 
sayaji shinde
 
तपोवनातील वृक्षतोडीवर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून तपोवनातील १,८०० झाडांची तोड प्रकरणी जाहीर निषेध नोंदविण्यात येणार आहे. हा निषेध मोर्चा शनिवारी, ६ डिसेंबरला सकाळी कमानीजवळील संभाजीनगर रोडवर घेतला जाणार असून, सर्व कलाकार तसेच वृक्षप्रेमी नागरिक सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी १,१५० एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी जवळपास १,८०० झाडे तोडली जात आहेत. सयाजी शिंदेंनी वृक्षतोडीला तीव्र विरोध करत म्हटले की, १० वर्षांच्या आतली झाडं मोडून त्याऐवजी इतर झाडं लावण्याची कल्पना चुकीची आहे.
 
 
सयाजी शिंदेंनी विचारले की, कुठल्याही साधू-संतांचा आपण कसा अपमान करू, मुळात झाडं तोडणे त्यांना पटेल का? ऋषी-मुनी झाडाखालीच तपश्चर्या करत होते, असेही त्यांनी नमूद केले. या वृक्षतोडीविरोधातील निषेधाच्या पार्श्वभूमीवर, मंत्री नितेश राणेंनी पर्यावरणवाद्यांवर केलेल्या वक्तव्यासंदर्भात विचारलेले प्रश्न त्यांनी उत्तर न देता टाळले. सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीच्या विरोधात ठाम भूमिका मांडली असून, झाडं महत्वाची आहेत आणि ती जपली जाणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.