आज रात्री नक्की बघा...वर्षाचा शेवटचा ' सुपर मून'

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
The last super moon of the year डिसेंबर महिना खगोलीय आकर्षणांनी भरलेला असणार असून वर्षाचा शेवटही एका मनमोहक दृश्याने सजणार आहे. आज, ४ डिसेंबरच्या रात्री या वर्षातील शेवटचा सुपर मून आकाशात झळकणार असून तो पाहणे एक अप्रतिम अनुभव ठरणार आहे. सूर्यास्तानंतर पूर्व दिशेला चंद्र हळूहळू उगवू लागेल, मध्यरात्रीच्या सुमारास आकाशात त्याची उंची सर्वोच्च बिंदूवर असेल आणि पहाटे पश्चिमेला मावळेल.
 
 
super moon
जवाहर तारांगणातील शास्त्रज्ञ सुरुर फातिमा यांच्या माहितीप्रमाणे, या सुपर मूनला ‘कोल्ड सुपर मून’ असे संबोधले जाते. २०२५ मधील चार सुपर मूनपैकी हा तिसरा आणि शेवटचा प्रकार असून पुढील सुपर मून जानेवारी २०२६ मध्ये दिसेल. या कोल्ड सुपर मूनची सर्वात खास बाब म्हणजे त्याचा अनोखा रंग आणि आकार. पृथ्वीच्या अत्यंत जवळ सुमारे ३५७,००० किमी अंतरावर असल्यामुळे तो नारंगी छटेने उजळून निघेल. यामुळे तो साध्या पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा जवळपास १० टक्के मोठा आणि ३० टक्क्यांपर्यंत अधिक प्रकाशमान दिसेल. हा चंद्र ‘लाँग नाईट मून’ आणि ‘मून बिफोर युल’ या नावांनीही ओळखला जातो.
 
 
डिसेंबर महिन्यात इतरही रोमहर्षक आकाशीय घटना दिसतील. २१ डिसेंबरची रात्र ही वर्षातील सर्वात लांब रात्र असणार आहे. संपूर्ण महिन्यात चंद्र विविध ग्रहांच्या जवळून जाताना दिसेल ७ डिसेंबरला गुरू जवळ, १८ डिसेंबरला बुध, १९ डिसेंबरला शुक्र आणि २७ डिसेंबरला शनीच्या शेजारी चमकताना पाहता येईल. याशिवाय, सूर्य सध्या सर्प राशीत असून १९ डिसेंबरला धनू राशीत प्रवेश करणार आहे. आजचा सुपर मून पाहणे ही खऱ्या अर्थाने निसर्गाने दिलेली सौंदर्याची भेट आहे. चांदण्याच्या प्रकाशात उजळणारी ही रात्र मन मोहून टाकणारी ठरेल. हा देखावा नक्की पाहावा, तसेच चंद्राचा पृथ्वीवरील भरती-ओहोटीवरचा प्रभाव आणि पौर्णिमेच्या वेळी होणाऱ्या बदलांविषयी जाणून घेणेही उत्सुकतेचे ठरेल.