सेवातीर्थ

    दिनांक :04-Dec-2025
Total Views |
 
वेध...
 
 
नंदकिशोर काथवटे
sevatirtha देशाच्या लोकशाही प्रवासात काही क्षण असे येतात, जे केवळ प्रशासकीय निर्णय म्हणून नोंदविले जात नाहीत, तर येणाऱ्या काळाच्या दिशादर्शक म्हणून इतिहासात कोरले जातात. पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘सेवातीर्थ’ असे ठेवण्याचा निर्णय हा तसाच अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी क्षण आहे. ‘सरकार’ म्हटलं की अनेकांच्या मनात आजही दुरावा, कठोरपणा आणि आदेशांची प्रतिमा उभी राहते. पण लोकशाहीत शासन हे लोकांपासून वेगळे नसते. शासन म्हणजेच लोकसेवा, लोकांची इच्छा, लोकांचा विश्वास. ‘सेवातीर्थ’ हे नाव या नात्याला नव्या पवित्रतेची, नव्या ऊर्जेची दिशा देत आहे. तीर्थ म्हणजे काय? तीर्थ हा फक्त धार्मिक शब्द नाही. तीर्थ म्हणजे मनाला शांत करणारी जागा, तीर्थ म्हणजे पारदर्शकता, तीर्थ म्हणजे विश्वासाची शुद्धता. जेव्हा देशातील सर्वात महत्त्वाची कार्यालये, जिथे राष्ट्राचे मोठमोठे निर्णय घेतले जातात, त्या ठिकाणाला ‘सेवातीर्थ’ म्हणतात. तेव्हा हा बदल फक्त शब्दांच्या पातळीवर राहत नाही. या शब्दात शासनाची संपूर्ण विचारसरणी गुंफलेली आहे. आम्ही सत्तेसाठी नाही, सेवेच्या पवित्र भावनेसाठी आहोत. राजभवन ते लोकभवन हा शब्दाचा प्रवास दुराव्याऐवजी आपुलकी निर्माण करते.
 
 

सेवातीर्थ  
 
 
‘राजभवन’ या नावात एक राजेशाहीपणा, एक अंतर, एक बंद दरवाजा जाणवतो. पण ‘लोकभवन’ म्हटले की प्रथमच मनात जवळीक निर्माण करते. हे भवन राजाचे नाही, लोकांचे आहे, लोकांसाठी आहे. हे त्या भवनाच्या नावावरूनच स्पष्ट होते. नावे बदलणे ही केवळ बाह्य गोष्ट नाही. नाव म्हणजे ओळख आणि ओळख म्हणजे विचार. जेव्हा सरकारी इमारतींची नावे ‘लोकनिवास’, ‘कर्तव्य भवन’, ‘लोक कल्याण मार्ग’ अशी ठेवली जातात, तेव्हा त्या शब्दांनीच प्रशासनाचे उद्दिष्ट स्पष्ट होते. या बदलातून सरकार हे सांगू पाहते की, शक्ती हे लक्ष्य नाही; सेवा हीच खरी शक्ती आहे. नागरिक अनुभवतात ती भावना बदलण्याची गरज आज निर्माण झाली आहे. आजही अनेक साधे नागरिक सरकारी कार्यालयात जाताना मनात एक दडपण, भीती, चिंता घेऊन जातात. तिथे पोहोचताच जडपणा जाणवतो. काऊंटर, पायèया, नियम, रांगा जणू सेवा नव्हे, तर परीक्षा सुरू आहे. पण जर कार्यालयाचे नावच ‘सेवातीर्थ’ असेल, ‘कर्तव्य भवन’ असेल, ‘लोकभवन’ असेल, तर मनात जाणवणारा भाव बदलतो. नागरिकाला जाणवते की, मी इथे मागणी करायला नाही, हक्काने सेवा मिळवायला आलो आहे. एखाद्या तीर्थस्थळी गेल्यावर जशी निर्मळता, शांतता, विश्वास आणि मनःशांती मिळते, तशीच अनुभूती सरकारी कार्यालयातही मिळावी, हा या संकल्पनेचा गाभा आहे. सेवाभाव हा शासनाचा आत्मा आहे, हे विसरून चालणार नाही. शासनाचे खरे सामर्थ्य आदेशात नसते, तर सामान्य माणसाच्या चेहèयावर समाधान आणण्यात असते. सेवा, कर्तव्य, पारदर्शकता, उत्तरदायित्व ही मूल्ये आजच्या लोकशाहीची खरी गरज आहे. ‘सेवातीर्थ’ या नावातून जणू शासन स्वतःलाच स्मरण करून देत आहे की, निर्णय कितीही मोठे असले, तरी ते जनतेच्या कल्याणासाठीच आहेत.sevatirtha बदल फक्त इमारतींचा नसून मानसिकतेचा आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय प्रशासकीय नसून सांस्कृतिक आहे. समाजाच्या विचारांमध्ये, शासनाकडून अपेक्षांमध्ये आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीत ‘सेवा’ ही भावना केंद्रस्थानी यावी, हा मुख्य उद्देश आहे. एखाद्या राष्ट्राला सर्वात मोठा आधार असतो तो विश्वासाचा. विश्वास हरवला की लोकशाही कोसळते आणि विश्वास निर्माण झाला की देश प्रगतीच्या शिखरावर जातो. ‘सेवातीर्थ’ हे नाव हा विश्वास पुन्हा दृढ करण्याचा प्रयत्न आहे. शासन आणि जनता यांच्यातील नातं ‘दूरचे’ नाही, ‘आपले’ आहे, हे या नावातून स्पष्ट होते. नावात बदल करून शासनाने लोकांमध्ये विश्वासाचे टाकलेले हे एक पाऊल आहे. शासनाच्या इमारती कितीही भव्य असोत, त्यांची भव्यता लोकांच्या मनात निर्माण होणाèया विश्वासावरच टिकून असते. ‘सेवातीर्थ’ हा शब्द त्या विश्वासाचा दीपस्तंभ आहे. सेवातीर्थ हे नाव सांगते की, इथे सत्ता नाही, सेवा आहे. इथे बंद दरवाजे नाहीत, खुली मनं आहेत. इथे अधिकार नाही, कर्तव्य आहे. सरकारचे हे पाऊल म्हणजे केवळ नावात बदल करणे नसून सेवा हीच लोकशाहीची ओळख आहे, हे स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न आहे, ही जाणीव नव्याने दृढ करणारा एक ऐतिहासिक क्षण आहे. आणि म्हणूनच जिथे सेवा तीर्थासारखी पवित्र वाटते, तिथेच खरा ‘सेवातीर्थ’ जन्म घेतो.
 
9922999588
----