वॉशिंग्टन,
US F-16 crashes अमेरिकेच्या हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. एलिट थंडरबर्ड्स डेमोन्स्ट्रेशन स्क्वॉड्रनचे F-16C फायटिंग फाल्कन हे लढाऊ विमान दक्षिण कॅलिफोर्नियातील मोजावे वाळवंटात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले. सुदैवाने, अपघाताच्या क्षणी पायलटने तत्काळ इजेक्शन प्रणालीचा वापर करून स्वतःचा जीव वाचवला. सॅन बर्नार्डिनो काउंटी अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पायलटला किरकोळ दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेवाडातील नेलिस एअर फोर्स बेसकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, कॅलिफोर्नियाच्या नियंत्रित हवाई क्षेत्रात ही दुर्घटना घडली. लॉस एंजेलिसच्या उत्तरेस सुमारे २९० किलोमीटर अंतरावरील ट्रोना परिसरात विमान आपत्कालीन स्थितीत असल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कॅलिफोर्नियातील या अपघाताची चौकशी सुरू असून ५७ व्या विंग पब्लिक अफेयर्स ऑफिस लवकरच अधिकृत तपशील जाहीर करणार आहे. याच परिसरात २०२२ मध्ये नेव्हीचे F/A-18E सुपर हॉर्नेट कोसळून पायलटचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. थंडरबर्ड्स त्यांच्या अतिदक्षता आणि हवाई कौशल्यासाठी जगभरात ओळखले जातात. एअर शोदरम्यान ते इंचांवरून होणाऱ्या धोकादायक पण अचूक मॅन्युव्हर्ससाठी विशेष प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यांच्या दीर्घ इतिहासात अनेक दुर्घटनांची नोंद आहे. हवाई दलाच्या प्राथमिक निवेदनात या अपघाताच्या कारणांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.