कारंजात पोलिसांकडून बनावट नोटाची शेकडो बंडले जप्त

एक जण ताब्यात

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड,
Karanja fake currency, येथील शहर पोलिसांनी ४ डिसेंबर रोजी एका सराईत गुन्हेगाराच्या घरातून पाचशे रुपये मुल्याची शेकडो बनावट नोटांची बंडले जप्त केली असून, संबंधितास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.
 

Karanja fake currency, 
प्राप्त माहितीनुसार, काही दिवसापूर्वी येथील एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असणार्‍या व्यक्तीने मानोरा येथील एका व्यापार्‍याची नकली पाचशे रूपयांच्या नोटा देऊन फसवणूक केल्याची माहिती असून, या माहितीच्या व त्या गुन्हेगाराच्या वर्णनावरून ४ डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी स्थानिक गवळीपुरा येथील एका घरात छापेमारी केली. यामध्ये पोलिसांना त्याच्या घरातून एका मोठ्या पिशवीत ठेवलेल्या पाचशे रुपये मूल्याची बनावट नोटांची शेकडो बंडले आढळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल व संबंधित सराईत गुन्हेगार हसन उर्फ ईम्मी छट्टू निमसुरवाले रा. गवळीपुरा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
 
दरम्यान, कारंजा पोलिसांच्या माहितीनुसार जप्त केलेली बनावटी नोटांची बंडले लहान मुलांच्या खेळण्यातील आहेत. या बंडलावर काही चलनी नोटा ठेवून त्याद्वारे फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. त्यातील हा प्रकार असून, यात आणखी काहींचा सहभाग आहे का? अशा नकली नोटा देऊन आणखी कुणाची फसवणूक केली का? नगर परिषद निवडणुकीत हा नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला का? या सर्व बाबी पोलिसांकडून तपासल्या जात आहे.