विमलहंस महाराज यांना आचार्य पदवी प्रदान

मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमला

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
वाशीम
Vimalhans Maharaj नंदिसूत्रच्या मंत्रोच्चाराच्या गजरात आचार्य विमलबोधी सुरिश्वरजी महाराज यांनी पंन्यास प्रवर विमलहंस महाराज यांना ५ डिसेंबर रोजी आचार्य पदवी प्रदान केली. विमलहंस विजयजी महाराज आता यापुढे श्री अंतरीक्ष तीर्थ अभ्युदय प्रेरक प.पू. आचार्य देव श्रीमद्विजय विमलहंस सूरीश्वर महाराजा म्हणून ओळखले जातील.
 

Vimalhans Maharaj 
शिरपूर जैनमध्ये पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात श्वेतांबर जैन समाजाचे पुरुष, महिला, युवक, युवती व बालकांसह हजारोंच्या संख्येने भाविक या दैदिप्यमान कार्यक्रमाचे साक्षीदार बनले. आचार्य पदवीदान सोहळ्यानिमित्त वर्धमान तपोनिधी आचार्य भगवंत विमलबोधी सूरीश्वर महाराज यांचे अन्य मुनिश्रीसह पुणे येथून १ डिसेंबर रोजी शिरपूर नगरीत आगमन झाले होते. याप्रसंगी वर्धमान तपोनिधी आचार्य भगवंत विमलबोधी सूरीश्वर यांच्यासह मुनीराज रत्नवल्लभ विजय महाराज, पंन्यास प्रवर परमहंस विजय महाराज, गणिवर्य राजहंस विजय, मुनीराज श्रमणहंस विजय, पवित्रबोधी विजय, हितबोधी विजय, धीरबोधी विजय, ऋजुश्रमन विजय, हंसदृष्टी विजय, अभय शेखर सुरिश्वर महाराज यांच्या आद्यानुवर्तीनी व शासन प्रभाविका अनंत कीर्तीश्री यांच्या सुशिष्या राजरत्नाश्री , महासती सौम्यप्रप्रज्ञाश्री आदीसह साध्वी व साधू भगवंतांची उपस्थिती लाभली. महोत्सवात विधीकारक हर्षदभाई शाह अकोला यांनी नूतन चौमुखी मंदिरात धार्मिक संगीतमय वातावरणात तीन दिवस सर्व श्रेष्ठ असे अरहद पूजन पार पाडले.
यावेळी श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिर, श्री विघ्नहर पार्श्वनाथ मंदिरसोबत पारसबाग परिसरातील नूतन चौमुखी मंदिरात अन्य विविध धार्मिक पूजन, अभिषेक, धार्मिक अनुष्ठान, भक्ती संगीत, भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे मॅनेजिंग ट्रस्टी दिलीप शाह, अध्यक्ष रमेशचंद्र जव्हेरी, ट्रस्ट मंडळातील सर्व विश्वस्त यांच्यासह महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली व भारतातून मोठ्या संख्येत भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानचे सर्व ट्रस्टी मंडळ तसेच कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.